कदम-देशमुखांच्या दुसऱ्या पिढीत पहिल्यांदा थेट लढत
सांगली : पलूस-कडेगाव मतदारसंघात कदम व देशमुख ही दोन घराणी पारंपरिक विरोधक आहेत. या घराण्यातील दुसऱ्या पिढीतील माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम व भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्यात पहिल्यांदाच थेट लढत होत आहे. त्यामुळे ही लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.
पूर्वीच्या भिलवडी-वांगी मतदारसंघाचे नाव आता पलूस-कडेगाव विधानसभा झाले आहे. १९९५ पासून माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम व माजी आमदार संपतराव देशमुख या दोन घराण्यांत पारंपरिक लढत सुरू झाली. १९९६ ला संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू पृथ्वीराज देशमुख व डॉ. पतंगराव कदम अशी लढत झाली.
पुढे २०१८ साली डॉ. पतंगराव कदम यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र डॉ. विश्वजित कदम हे सलग दोन वेळा निवडून आले. यावेळी २०१८ ची पोटनिवडणूक व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देशमुख घराण्यातील कोणी मैदानात नव्हते. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत कदम-देशमुख या दोन पारंपरिक विरोधी घराण्यातील दुसऱ्या पिढीत पहिल्यांदाच थेट लढत होत आहे.
मतदारसंघातील कळीचे मुद्दे
ताकारी व टेंभू योजनेच्या कामांचा श्रेयवाद मतदारसंघात सुरू आहे. त्यासाठी डॉ. पतंगराव कदम यांनी निधी आणला, तर संपतराव देशमुख हे या योजनेचे जनक आहेत, असे दावेप्रतिदावे सुरू आहेत. साखर कारखान्यांची बिले व उसाला दर यावरून आरोप होत आहेत. यामध्ये उसाची बिले शेतकऱ्यांना देण्यास विलंब व थकबाकी असा मुद्दा गाजत आहे.
पलूस तालुक्यातील क्षारपड जमिनीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर तातडीने व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. महापूर आल्यानंतर नदीकाठच्या गावांना स्थलांतरित व्हावे लागते. हे स्थलांतर कायमस्वरूपी थांबविण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. टेंभू योजनेची जलवाहिनी शेताच्या बांधावर पोहोचविण्याचे आश्वासन दोन्ही बाजूने मतदारांना दिले जातेय.
२०१९ मध्ये काय घडले ?
डॉ. विश्वजित कदम - काँग्रेस (विजयी)
१,७१,४९७
संजय विभुते - शिवसेना
८,९७६
नोटा
२०,६५१
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.