Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुढील पाच वर्षात सांगली आदर्श शहर बनवायचे आहे:,सुधीरदादा गाडगीळ; टिळक चौकात प्रचार बैठक

पुढील पाच वर्षात सांगली आदर्श शहर बनवायचे आहे:,सुधीरदादा गाडगीळ; टिळक चौकात प्रचार बैठक
 

सांगली, दि.१५: गेल्या दहा वर्षात आपण सांगलीला विकासाच्या मार्गावर आणले आहे. या पुढील पाच वर्षात आपल्याला हे शहर आदर्श बनवायचे आहे, असे प्रतिपादन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले.

येथील टिळक चौकात आमदार गाडगीळ यांच्या प्रचारासाठी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार अध्यक्षस्थानी होते. सुधीरदादांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच त्यांचे महिलांनी औक्षण केले. लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला दादांनी पुष्पहार अर्पण केला.विविध मंडळे तसेच ओतारी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार गाडगीळ म्हणाले, मतदान हे आपले पवित्र कर्तव्य आहे हे लक्षात ठेवा. मतदानाच्या बाबतीत कुणीही आळस करू नका. आपल्याला गाफील राहून चालणार नाही. मतदानातून तुम्ही मला भक्कम पाठबळ मला द्या. सांगलीच्या आणखी विकासाची, सांगलीला चांगले बनवण्याची जबाबदारी मी घेतो.

शेखर इनामदार म्हणाले, सांगली मतदारसंघासाठी दादांनी भरभक्कम निधी आणला आहे.  कुपवाडमधील ड्रेनेज योजनेसाठी २७६ कोटी,  सांगली पेठ रस्त्यासाठी ८६० कोटी आणि सांगली -कोल्हापूर सहापदरी रस्त्यासाठी ११९६कोटी रुपये एवढा प्रचंड निधी दादांनी आणला आहे. यापूर्वी दोन किंवा तीन लाखाच्या कामाचे नारळ फोडले जात असत. आता  कोट्यावधी रुपयांच्या योजना दादांच्या प्रयत्नाने राबवल्या जात आहेत.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदकुमार बापट म्हणाले, सुधीरदादांनी गेल्या दहा वर्षात कधीही कुणावर टीका केली नाही.  त्यांनी कोणती कामे केली आहेत, कोणती पूर्ण करायची आहेत आणि यापुढे कोणती कामे करणार आहेत एवढेच फक्त ते भाषणात सांगतात. विरोधकांबद्दलसुद्धा टीकेचा एकही शब्द न उच्चारणारा असा नेता दुर्मिळच असेल.
भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन शिंदे म्हणाले, महापुराच्या काळात तसेच कोरोना काळातही दादांनी लोकांच्या मदतीसाठी प्रचंड काम केले आहे. मी महापालिकेत काम करत होतो, त्यामुळे त्यांच्या कामाचा मी साक्षीदार आहे. फक्त त्या कामाचा किंवा मदतीचा त्यांनी कधी गाजावाजा केला नाही. कमीत कमी बोलायचे आणि जास्तीत जास्त काम करायचे असा त्यांचा स्वभाव आहे. या कार्यक्रमाचे संयोजक अशोक शेट्टी म्हणाले, दादांनी कोणताही भेदभाव न करता सर्व समाजाची कामे केली आहेत. त्यामुळेच आज या ठिकाणी सर्व समाजातील लोक उपस्थित आहेत. दादांना यावेळी प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून द्यायचे आहे.त्या दृष्टीने प्रत्येकाने पुढचे चार दिवस पूर्ण लक्ष देऊन काम करायचे आहे.
ओतारी समाज, दैवज्ञ समाज,तुळुनाड समाज तसेच ओम गणेश कला क्रीडा मंडळ ,साईनाथ मंडळ, बाल गणेश मंडळ अशा विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपचे नेते अविनाश मोहिते, उर्मिला बेलवलकर,आशाताई शिंदे,नितीन काका शिंदे,स्मिता भाटकर, अर्चना ओतारी, संजय ओतारी, संदीप ओतारी, विशाल यादव, विक्रांत यादव, उमेश कोरे, राजेश पावसकर, सागर ओतारी, बाळूमामा यादव, गौरव कुलकर्णी ,वैभव वेदपाठक, विजय भुरके ,प्रशांत शहा, राजू पेंडूरकर, धनंजय भाटकर, पंढरीनाथ माने आदि उपस्थित होते.

१)सांगली: टिळक चौकातील प्रचार बैठकीत बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ.

२)सांगली: टिळक चौकातील प्रचार बैठकीच्या वेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचा विविध संस्था संघटना तर्फे सत्कार करण्यात आला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.