मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात मागील आठवड्यात गुरुवारी (7 नोव्हेंबर 2024) रात्री धक्कादायक घटना घडलीय. येथे तीन मुलांची आई असणाऱ्या महिलेवर (वय 31) अतिरेक्यांनी बलात्कार करून तिला जिवंत जाळलं.
तसंच परिसरातील जवळपास 20 घरांना आग लावली. आता पीडित महिलेचा शवविच्छेदन अहवाल आला असून, यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झालेत. पीडित महिलेच्या शवविच्छेदन अहवालानुसार, पीडितेला मारण्यापूर्वी तिच्या शरीराला खिळे ठोकण्यात आले होते. तिच्यावर अमानुषपणे बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला जिवंत जाळण्यात आलं.
शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासे
या प्रकरणी जिरीबाम येथे पीडित महिलेच्या पतीनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये म्हंटले आहे की, 'अतिरेकी पीडितेच्या घरात घुसले, त्यानंतर त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिला जिवंत जाळले.' अतिरेक्यांनी त्या रात्री जैरावनमध्ये 17 घरं लुटून पेटवून दिली. हे आरोपी घाटी येथील संघटनेचे सदस्य असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
तर, दुसरीकडे आता पीडित महिलेचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. त्यानुसार पीडितेच्या उजव्या मांडीच्या मागील भागात मोठी जखम आहे. डाव्या मांडीच्या मध्यभागी एक खिळा आहे. पीडितेचा मृतदेह 99 टक्के जळालेला होता. शरीराचा वरचा उजवा भाग तर खालच्या बाजूचा काही भाग आणि चेहऱ्याची रचना गायब झालीय. यावरून पीडितेला मारण्यापूर्वी किती वेदना दिल्या असतील, हे स्पष्ट होत आहे. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा पीडितेचा पती आणि मुले कुठे होती, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
या घटनेचे गंभीर पडसाद आता उमटू लागलेत. फेरझावल आणि जिरीबामच्या आदिवासी जमाती वकील समितीनं आदिवासी बहुल जिल्ह्यांतील कुकी, झोमी, हमार लोकांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. चुडाचांदपूरमधील आदिवासी समुदायतील एक गट असलेल्या इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमनं हल्लेखोरांना अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.संबंधित घटनेला जवळपास एक आठवडा होत आला असून सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांसह विविध सरकारी यंत्रणा कार्यरत करण्यात आल्या आहेत. तर, आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे. परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी आवश्यक ती खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.