Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जी एस टी अधीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

जी एस टी अधीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले
 
हिंगोली : जिल्ह्यातील एका कंपनीची नोंदणी रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर केला नसल्याचा मोबदला म्हणून १० हजाराची लाच घेणाऱ्या केंद्रीय वस्तु व सेवाकर कार्यालयाच्या अधिक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी रंगेहात पकडले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

 
एका तक्रारदाराची कुरुंदकर फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमीटेड नावाची नोंदणीकृत कंपनी आहे. या ठिकाणी केळीचे चिप्स तयार केले जातात. कंपनीने मागील सहा महिन्यापासून जीएसटी रिटर्न दाखल केले नसल्याने कंपनीच्या मेलवर ७ ऑक्टोबर रोजी नोटीस प्राप्त झाली होती. त्यानंतर त्यांना ४ नोव्हेंबर रोजी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविले होते.
त्यानंतर कार्यालय अधिक्षक मनोज मगरे याने तक्रारदाराशी संपर्क करून नोंदणी रद्द करायची नसेल तर भेटण्याचे कळविले. त्यानंतर तक्रारदाराने ऑनलाईन रिटर्न दाखल केले. तसेच त्यांना ८ नोव्हेंबर रोजी नोटीस रद्द केल्याचे पत्रही मिळाले होते. त्यामुळे तक्रारदार मगरे यास भेटण्यासाठी गेले नाही. मात्र मगरे याने २२ नोव्हेंबर रोजी तक्रारदाराशी संपर्क करून तुम्ही भेटायला या अन्यथा नोंदणी रद्द करण्यासाठी वरिष्ठांकडे पाठवतो असे सांगत १० हजार रुपयांची मागणी केली.

त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यावरून लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, विनायक जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महम्मद युनूस, विजय शुक्ला, जमादार तान्हाजी मुंडे, रवींद्र वरणे, ज्ञानेश्‍वर पंचलिंगे, भगवान मंडलीक, गोविंद शिंदे, गजानन पवार, राजाराम फुफाटे, महिला पोलिस कर्मचारी योगीता अवचार, चालक शिवाजी वाघ यांच्या पथकाने कोथळज रोड भागात सापळा रचला होता. त्यानंतर मगरे याने तक्रारदाराकडून पैसे घेताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.