अमरावती : कुठल्याही मंदिरात देवदर्शनासाठी गेल्यानंतर तिथं भाविकांना प्रसाद दिला जातो. या प्रसादामध्ये बऱ्याचदा लाडू, पेढा किंवा तत्सम आरोग्यदायी शाकाहारी पदार्थांचा समावेश असतो. पण अशा खाद्य पदार्थांऐवजी प्रसाद म्हणून पैशांचं वाटप केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का?
ऐकलं नसेल तर आम्ही तुम्हाला असं एक मंदिर सांगणार आहेत जिथं प्रसाद म्हणून पैशांचं वाटप केलं जातंय. विशेष म्हणजे हे मंदिर महाराष्ट्रातील आहे. या पैशांच्या प्रसादाचं वाटप होत असल्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
कुठलं आहे मंदिर?
महाराष्ट्रातील विदर्भातील अमरावती इथल्या काली माता मंदिरात हा प्रकार दिसून आला आहे. या मंदिरात भाविकांनी कालीमातेचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या हातावर एक पुजारी प्रसाद म्हणून चक्क चलनी नोटा ठेवतो. या नोटांसोबत प्रसाद म्हणून मुरमुरे दिले जात आहेत. हा पुजारी रांगेत येणाऱ्या भाविकांच्या हातावर समोर ठेवलेल्या मोठ्या पात्रातून आपल्या हाताच्या बोटांमध्ये जेवढ्या नोटा मावतील तेवढ्या घेतो आणि त्या भाविकांच्या हातावर ठेवताना दिसतो आहे.
भाविकही मोठ्या भक्तिभावानं हा नोटांचा प्रसाद स्विकारताना दिसत आहेत. समोर ठेवलेल्या पात्रातील नोटा संपायला आल्यानंतर त्यात आणखी नोटांची भर घातलाना बाजुला उभा असलेला एक व्यक्तीही या व्हिडिओमध्ये दिसतो आहे. एकूणच नोटांच्या प्रसादाची कमतरता भासू नये याचीही काळजी इथं घेतली जात आहे.
राजकीय पक्षाचा कार्यक्रम?
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यातच हा व्हिडिओ समोर आल्यानं अनेकांनी यावर शंका देखील उपस्थित केली आहे. कुठल्यातरी राजकीय पक्षाकडून मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप काही युजर्सनं या व्हिडिओवर कमेंट करुन केला आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं जर खुलेआम पैशांचं वाटप होत असेल तर त्याची चौकशी देखील केली जाऊ शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.