सांगली : मी निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला, आता जयश्री पाटील याच महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचं जाहीर करतो असं सांगत खासदार विशाल पाटील यांनी विधानसभेतही सांगली पॅटर्न राबवणार असल्याचं स्पष्ट केलंय.
वसंतदादा पाटील घराण्यावर काँग्रेस सातत्याने अन्याय का करतंय असा सवाल विशाल पाटलांनी विचारला. तसेच सांगलीतील भाजपच्या उमेदवाराचा पराभव काँग्रेसचा उमेदवार करू शकत नाही, त्यामुळे अपक्ष असलेल्या जयश्री पाटील यांनाच निवडून द्या असं विशाल पाटील म्हणाले. सांगली विधानसभेत अपक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील यांच्या प्रचार शुभारंभ सभेत खासदार विशाल पाटील यांनी हे वक्तव्य केलं.
सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली. त्यानंतर जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांनी माघारही घेतली नसल्याने सांगलीमध्ये तिरंगी लढत होणार आहे.
'जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार'
विशाल पाटील म्हणाले की, "जयश्री पाटील यांची उमेदवारी ही महाविकास आघाडीची उमेदवारी आहे असे मी जाहीर करतो. कारण मी खासदार म्हणून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. जसं लोकसभेत 99 खासदार निवडून आले आणि शंभरावा होतो तसं जयश्री पाटील शंभरावे आमदार असतील."
आता संघर्ष संपला पाहिजे ही आमची भूमिका होती. जयश्री पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यात आम्ही कमी पडलो असं सांगत विशाल पाटील म्हणाले की, "सांगली जिल्ह्यात एक पॅटर्न दिसून येतोय. 2014 नंतर वसंतदादा कुटुंबाला एकदाही उमेदवारी भेटली नाही. लोकसभेत आणि विधानसभेत फसवणूक झाली. वसंतदादा कुटुंबांने काँग्रेस पक्षाच्या विरोधात नेमकी काय चूक केली हे कळत नाही. वसंतदादा कुटुंबाची निष्ठा कुठे कमी पडली का? आदर्श कुठे कमी पडले का? एवढं होऊनी मी खासदार झाल्यावर पहिल्यांदा काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला."
जयश्री पाटील भाजपचा पराभव करतील
विशाल पाटील म्हणाले की, "सातत्याने आमच्या कुटुंबावर अन्याय होत गेला? का न्याय मिळत नाही हे कळत नाही. जयश्री वहिनी लोकसभेला सर्वात पुढे होत्या. मग मी का त्यांच्या सभेला येऊ नये? ही महाविकास आघाडी फक्त तीन पक्षाची नाही. यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, विशाल पाटील अपक्ष म्हणून सुद्धा याच विकास आघाडीचा घटक आहे. काँग्रेसने दिलेला उमेदवार हा भाजपच्या उमेदवाराला पराभव करणास सक्षम नाही. म्हणून आम्ही उमेदवार दिला आहे आणि जयश्री पाटील या माझ्या उमेदवार आहे हे मी जाहीर करतो."येणाऱ्या निवडणुकीत जयश्री वहिनी यांचाच विजय होणार. सांगलीला पहिल्यांदाच महिला आमदार निवडणार आहे असं विशाल पाटील म्हणाले. मला तुम्ही खासदार म्हणून निवडून दिला आहे. तसेच माझ्या विचाराचा आमदार निवडून द्या. मदन पाटील सांगलीचा अस्सल हिरा होते. तर जयश्री पाटील सांगलीच्या हिरकणी आहेत. त्यांच्या नावातच श्री आणि जय आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जयश्रीताईंचाच विजय होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माझा निर्णय योग्यच
अपक्ष उमेदवार जयश्री पाटील म्हणाल्या की, "माझा कालाचा निर्णय योग्यच झाला आहे असे वाटते. या घरावर लोक किती प्रेम करतात हे समजून आले. ज्यावेळी आमच्यावर अन्याय झाला, त्यावेळी जनतेने आम्हाला साथ दिली. मी भाऊंच्या बरोबरीने काम केले. भाऊंच्या पश्चात साडे नऊ वर्षात पक्षात काम केले. आम्ही गेली अनेक वर्षे काँग्रेसचे काम करतो. मदनभाऊ अपक्ष म्हणून निवडून आले आणि 11 आमदार घेऊन ते काँग्रेसमध्ये गेले. आठ महिनेच भाऊंना काम करण्याची संधी मिळाली."
आम्ही काँग्रेस पक्ष वाढवला म्हणणाऱ्यांना सांगू इच्छिते, मागील निवडणुकीत आम्हाला थांबवले. पृथ्वीराज पाटील दादांच्या समाधीवर जाऊन शपथ घेताय. तुम्ही काय काम केले हे सांगा? असा सवाल जयश्री पाटील यांनी विचारला.जयश्री पाटील म्हणाल्या की, "बंडाचा झेंडा स्वतः घ्यायचा आणि आता म्हणायचे काँग्रेसचेच लोक काँग्रेसच्या विरोधात काम करत आहेत. हे नेहमीच आमच्या घराबाबत घडत आले आहे. मी महिला म्हणून उमेदवारी मागितली होती. इतर क्षेत्रात महिलांना 33 टक्के आरक्षण आहे. पण गेली 44 वर्षे सांगलीत महिलांना उमेदवारी दिली नाही. विशालदादा आणि विश्वजीत कदम यांनी खूप प्रयत्न केले. आम्ही काँग्रेसच्या विचाराचे आहोत. माझे चिन्ह हिरा आहे. आता सोन्यावर पाणी पडते का तेवढे बघायचे आहे."कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम 9 वर्षापासून मी करत आले. कार्यकर्ते, सांगलीच्या जनतेसोबत, तळागाळातील लोकांसमवेत आमची नाळ आहे. विशाल दादांना संसदेत पाठवले, ते आवाज उठवत आहेत. आता मला संधी दिली तर नक्कीच सोने करेन. विशालदादा, प्रतीकदादा आपल्या मागे आहेत. आपण सर्वांनी मदनभाऊंच्या प्रमाणे माझ्यावर प्रेम करा आणि मला निवडून द्या असं आवाहन जयश्री पाटील यांनी केलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.