एनडीएसोबत युती असल्याने आम्ही तुमच्यासोबत राहू, मात्र या निवडणुकीत भाजपचे काम करणार नाही, असा इशारा आठवले रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राष्ट्रीय संघटन सचिव भूपेश थूलकर यांच्या माध्यमातून विदर्भातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना दिला आहे.
2014 साली तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि भूपेश थुलकर रिपा प्रदेशाध्यक्ष म्हणून करण्यात आलेल्या लेखी करारानुसार आम्ही सोबत आलो.10 वर्षे झालीत पण दिलेल्या आश्वासनांचे कुठलेही पालन झालेले नाही. आघाडी धर्म पाळला गेला नाही. लोकसभा, विधानसभा तसेच विधान परिषद निवडणूक आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या तसेच महामंडळ अध्यक्ष नियुक्ती ह्या कुठल्याही बाबतीत रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेतले नाही. संधी दिली गेली नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त करणारे पत्र थूलकर यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना पाठविले आहे. आपणही विचार करावा, अन्यथा आम्हाला मोकळीक द्यावी, अशी विनंती केली आहे.
विधानसभा निवडणुकीचे नामांकन अर्ज दाखल करताना भाजपने विश्वासात घेतले नाही. संविधान चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यावर आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे पक्ष कार्यकर्त्यात पदाधिकारी व आंबेडकरी जनतेत नाराजी असल्याचा सुरही यात आळवण्यात आला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी असताना रिपाचे 4 खासदार होते. त्यानंतर दोन व नंतर रामदास आठवले स्वतः खासदार होते. मंत्रीपद मिळाले, आमचे आमदार झाले, विविध ठिकाणी सत्तेत सहभाग देण्यात आला.
मात्र, महायुतीच्या काळात पक्षाकडे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा संताप या पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईमध्ये कलिना मतदार संघ रिपाईला सोडल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले, असले तरी कमळ चिन्हावर निवडणूक लढविणारे अमरजीत सिंग हे भाजपचे संघाचे उमेदवार आहेत. ते रिपाईचे उमेदवार होऊ शकत नाहीत. यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारासोबत आम्ही राहणार असलो तरी कार्यकर्ते काम करण्यास तयार नाहीत, असा इशाराही थूलकर यांनी या पत्रातून दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.