Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर परिक्षेत्रात आतापर्यंत १९.१३ कोटींची मालमत्ता जप्तविशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहिती

कोल्हापूर परिक्षेत्रात आतापर्यंत १९.१३ कोटींची मालमत्ता जप्त विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहिती
 

कोल्हापूर:- राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य, जिल्हा सीमांवरील तपासणी नाक्यांवर सजग राहून तपासणी केली जात आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण येथील पोलिसांनी आतापर्यंत ६.६४ कोटींची रोकड, २.८३ कोटींची दारू आणि रसायने, २२.२४ लाख किमतीचा गांजा, ७.५७ कोटींचे सोने आणि ६० किलो चांदी, १.८७ कोटींचा गुटखा अशी तब्बल १९.१३ कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यापुढील काळातही अवैध व्यवसायांवर अधिक प्रभावी कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध व्यवसाय, शस्त्रे, अंमली पदार्थ, दारू, अवैध रोकड यावर प्रभावी व गुणात्मक कारवाई करण्याच्या सूचना पाचही जिल्ह्यातील पोलिस अधिक्षकांना महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी दिल्या आहेत. आतापर्यंत निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईबाबत ते म्हणाले, परिक्षेत्रात प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. कलम १२६ प्रमाणे २४ हजार ४७, १२८ प्रमाणे २४३, १२९ प्रमाणे १ हजार ८२४, १७० नुसार २७, १३५(३) प्रमाणे ८ हजार १३६, एमपीडीएनुसार २, मोकाअंतर्गत एका टोळीतील सातजणांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही अशाप्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहणार असल्याचे महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी सांगितले.
परिक्षेत्रात आतापर्यंत २३ पिस्तूल, कट्टे, ३६ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यातील संबंधितांवर गुन्हे दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. परिक्षेत्रात आचारसंहिता उल्लंघनाच्या कोल्हापूर जिल्ह्यात ३ दखलपात्र, ९ अदखलपात्र, सांगली जिल्ह्यात १ दखलपात्र, २ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर सोलापूर ग्रामीणमध्ये दखलपात्र आणि अदखलपात्र प्रत्येकी एक, पुणे ग्रामीणमध्ये ५ दखलपात्र, ३ अदखलपात्र असे परिक्षेत्रात एकूण १० दखलपात्र आणि १५ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही श्री. फुलारी यांनी सांगितले. 

निवडणुकीच्या अनुषंगाने कर्नाटकातील पोलिस अधिकाऱ्यांसमवेत सीमा समन्वय बैठक घेण्यात आली असून तीन जिल्ह्यांतील आंतरराज्य सीमांवर ३६ तपासणी नाके चोवीस तास सुरू आहेत. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांवर अचानक भेटी देऊन पाहणी केल्याचेही श्री. फुलारी यांनी सांगितले. निवडणुका निःपक्षपाती, निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी पोलिस दलाने पूर्ण उपाययोजना केली असून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहनही महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.