मुंबई : खासदार शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली. राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाने तर खोत यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
दरम्यान, सध्याची राजकीय परिस्थित पाहून तसेच केलेले विधान निवडणुकीत अडचणीचे ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन सदाभाऊ खोत यांची भाषा नरमली आहे. त्यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. सदाभाऊ खोत यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे.
सदाभाऊ खोत माफी मागताना काय म्हणाले?
सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत दिलगीरी व्यक्त केली आहे. ही दिलगिरी व्यक्त करत असताना त्यांनी ग्रामीण भाषेचा दाखला दिला आहे. मी बोललेली भाषा ही गावगाड्याची भाषा आहे, असे ते म्हणाले. "कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे. परंतु काही लोकांनी त्या शब्दांचा विपर्यास केला. त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते शब्द मी मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो," असे खोत म्हणाले.
गावगाड्याची भाषा समजायला....
तसेच, "मी वापरलेली भाषा ही गावगाड्याची भाषा आहे. कारण एखादी व्यक्ती आभाळाकडे बघून बोलत असेल तर आम्ही त्याला आरशात बघ असं म्हणतो. गावगाड्याची भाषा समजायला मातीमध्ये रुजावं लागतं. मातीमध्ये राबावं लागतं. मातीमध्येच मरावं लागतं. त्यानंतरच गावाकडची आणि मातीची भाषा समजते," असेही खोत यांनी सांगितले.
सदाभाऊ खोत यांच्याविरोधात निदर्शने
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील खोत यांच्या या विधानानंतर शरद पवार यांच्यावरील अशी भाषा आम्ही खपवून घेणार नाही, असे म्हणत त्यांची नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही खोत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सदाभाऊ खोत यांची पत्रकार परिषद उधळून लावण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आला होता. त्यानंतर ही स्थिती लक्षात घेता सदाभाऊ खोत पुण्यातील पत्रकार परिषदेला येणार नाहीत. ते इस्लामपूरमधील त्यांच्या घरीच थांबणार आहेत. दुरीकडे सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) जिथे पत्रकार परिषद होणार आहे तिथे खोत यांच्याविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.