Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'मोदींची सभा नको रे बाप्पा!' भाजप उमेदवारांना धडकी

'मोदींची सभा नको रे बाप्पा!' भाजप उमेदवारांना धडकी


वर्धा : विधानसभा निवडणुकीत विविध पक्ष आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करीत असते. त्यात भाजपच्या यादीत पण राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्टार नेते असतातच. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव सर्वात अग्रभागी.


मोदी यांची सभा माझ्या मतदारसंघात व्हावी, असा लकडा भाजप नेते लावतात. मात्र, हेच नेते आता नको, असे म्हणायला लागल्याचे दिसून आले आहे.

४ ते ९ नोब्हेंबरदरम्यान नरेंद्र मोदी यांचा दौरा नियोजित असून त्यासाठी कोणत्या विधानसभा मतदारसंघात सभा अपेक्षित आहे, अशी विचारणा प्रदेश कार्यालयाकडून जिल्ह्यात झाली. तेव्हा उत्सुकता दिसून आली नाही. एका उमेदवाराचे 'राईट हॅन्ड' समजल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले की, आम्ही स्पष्ट नकार कळविला. कारण पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे खूप मोठा व्याप असतो. त्यात चार-पाच दिवस तयारीत जातात. साजेशी गर्दी जमवावी लागतेच. खर्च होतोच. प्रचाराच्या घाईत हा नुस्ता ताप ठरतो. म्हणून आम्ही कळविले की, मोदी सोडून अन्य कोणत्याही नेत्यांची सभा द्या. आनंदात घेऊ.

भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट म्हणतात, मोदींच्या सभेबाबत विचारणा झाली होती. पण एक लोकसभावेळी व दुसरी विश्वकर्मा कार्यक्रमवेळी अशा मोदी यांच्या दोन सभा दोन महिन्यात झाल्याच आहेत. त्यामुळे त्यांचा पुन्हा वेळ घ्यायचे कारण काय, अशी भावना असू शकते. आणि वेळ जातो हे खरं असले तरी त्यांच्या सभेचा फायदा होतो, हे कसे नाकारणार. म्हणून पुढील काही दिवसांत मोदी यांच्या सभेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र विरोधक म्हणतात की, मोदी यांच्या सभेचा फायदा झाला नसल्याची बाब लोकसभा निवडणुकीत दिसून आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तर जाहीरपणे म्हटले की, मोदी यांनी अधिकाधिक सभा महाराष्ट्रात घेतल्या पाहिजे. त्याचा लाभ आम्हाला चांगलाच होणार. भाजप नेते म्हणूनच धास्तावून गेले असावे, अशी एका आघाडीच्या नेत्याने मल्लिनाथी केली.

वर्धा जिल्ह्यातील सर्व चारही जागांवर भाजप लढणार आहे. लोकसभा हरल्याने आता भाजप नेत्यांनी या चारही जागा युतीतून खेचत तगडे उमेदवार दिल्याचे नेते सांगतात. त्या सर्व जिंकून १०० टक्के यश खेचण्याचा निर्धार ते व्यक्त करतात. पण यासाठी मोदी यांची सभा घेण्यात ते का कचरतात, ही बाब मात्र विसंगत ठरत असल्याचे दिसून येते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.