Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अपेक्षित निकालांसाठी दबाव, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची कबुली, राजकारणावरही भाष्य

अपेक्षित निकालांसाठी दबाव, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची कबुली, राजकारणावरही भाष्य
 
 
नवी दिल्ली: न्यायालयांतील खटल्यांच्या निकालांवर प्रभाव टाकण्यासाठी काही दबावगटांकडून सोशल मीडियाचा वापर केला जात असून, न्यायाधीशांनी याबाबत सतर्क राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी केले. 'आजकाल लोक यूट्युब किंवा अन्य सोशल मीडियावरील २० सेकंदांच्या व्हिडीओवरून मत ठरवतात व हे धोकादायक आहे', असेही ते म्हणाले.

'काही विशेष हितसंबंध असलेले गट किंवा दबावगट आज सोशल मीडियाचा वापर करून न्यायालयांची मते व खटल्यांच्या निकालांवर परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक नागरिकाला कोणत्याही निकालाचा आधार समजून घेण्याचा आणि न्यायालयाच्या निकालांवर आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. परंतु, निकालांच्या पलीकडे जाऊन जेव्हा न्यायाधीशांना व्यक्तिगतरित्या लक्ष्य केले जाते, तेव्हा ते खरोखरच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो', असे चंद्रचूड एका चर्चासत्रात बोलताना म्हणाले. 'न्यायालयांचे निकाल बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या गटांचे न्यायाधीशांवर सतत लक्ष असते. लोकशाहीत कायद्यांची वैधता ठरवण्याचा अधिकार घटनात्मक न्यायालयांना सोपवण्यात आला आहे', असेही त्यांनी नमूद केले.

'राजकारणात जायला बंधन नाही, परंतु...

न्यायमूर्तीनी राजकारणात प्रवेश करावा का, असे विचारले असता, संविधान किंवा कायद्यात असे करण्यावर कोणतेही बंधन नसल्याचे चंद्रचूड म्हणाले. 'निवृत्तीनंतरही समाज तुमच्याकडे न्यायाधीश म्हणून पाहतो. त्यामुळे न्यायमूर्तीनी निवृत्त झाल्यानंतर इतरांप्रमाणे वागणे योग्य नाही. न्यायाधीश म्हणून केलेल्या कामाचे मूल्यमापन करणाऱ्या लोकांवर निवृत्तीनंतरच्या निर्णयांचा काय परिणाम होईल याचा विचार न्यायमूर्तीनी करायला हवा', असे ते म्हणाले. 'निवडणूक निकालाला न्या. चंद्रचूड जबाबदार' खासदार संजय राऊत यांचा आरोप मुंबई : 'निकालाच्या दिवशी पहिल्या दोन तासांत बरोबरीची लढाई होती.
मात्र, हा निकाल आधीच ठरलेला होता, फक्त मतदान होऊ दिले. याला सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे जबाबदार आहेत. अडीच वर्षे त्यांनी निर्णय दिला नाही. घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकले नाहीत. त्यामुळे आमदारांमध्ये पक्ष बदलण्याची भीती राहिली नाही. चंद्रचूड यांचे नाव काळ्या अक्षराने लिहिले जाईल,' अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी रविवारी टीका केली.
 
'जनतेच्या न्यायालयात न्याय विकत घेण्यात आला. आम्ही लढाई अर्धवट सोडणार नाही. मतविभागणी झाली. हा मोठा फटका आम्हाला बसला. वंचित, आणि मनसे यांचे उमेदवार उभे करण्यात आले होते. आता गुजरातची लॉबी मुख्यमंत्री कोण होणार, हे ठरवणार आहे. गुजरातमध्ये त्यांनी शपथविधी घ्यावा,' असे राऊत म्हणाले. राज ठाकरे यांनी त्यांचे उमेदवार विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवले होते. पण, त्यांना या निवडणुकीत यश मिळाले नाही. जनतेने त्यांना जनादेश नाकारला. लोकसभेत राज ठाकरे यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला होता. तर यावेळी मनसेने अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. पण त्यांना यश मिळाले नाही, असेही ते म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.