Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मणिपूर ते केनिया, अमूर ससाण्याचा ७ हजार ३०० किलोमीटरचा प्रवास; सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये पाहुणचार

मणिपूर ते केनिया, अमूर ससाण्याचा ७ हजार ३०० किलोमीटरचा प्रवास; सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये पाहुणचार


सांगली : मणिपूरमधून दूरदेशीच्या प्रवासाला निघालेल्या अमूर ससाण्याने सांगली जिल्ह्यातही पाहुणचार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल साडेसात हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या ससाण्याने जिल्ह्यातील कडेगाव येथे दिवसभरासाठी विश्रांती घेतल्याची नोंद भारतीय वन्यजीव संस्थेने केली आहे.

वन्यजीव संस्थेने सॅटेलाईट टॅग लावलेला 'चिऊलुआन-२' नामक अमूर ससाणा मणिपूरमधून सोडला होता. त्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतून प्रवास करत केनियापर्यंतचे स्थलांतर पूर्ण केले. यादरम्यान, तो कडेगावमध्येही थांबला. त्यानंतर गुहागरमार्गे अरबी समुद्रात प्रवेश करून आफ्रिकेतील सोमालिया देश गाठला. १४ ते २७ नोव्हेंबर या १३ दिवसांत तब्बल ७ हजार ३०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. सध्या तो केनियामध्ये स्थिरावला आहे.

अमूर ससाणा हे पक्षी उत्तर चीन, आफ्रिका असे हजारो किलोमीटरचे स्थलांतर करतात. उत्तर चीनमध्ये प्रजनन करून हिवाळ्यासाठी आफ्रिकेत जातात. यादरम्यान भारतात नागालॅण्ड आणि मणिपूरमध्ये विश्रांतीसाठी थांबतात. लांब पल्ल्याचे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे उड्डाण मार्ग आणि या मार्गांवरील पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करण्यासाठी टॅगचा उपयोग होतो.
२०१६ पासून 'केंद्रीय पर्यावरण मंत्रालया'च्या परवानगीने पक्षीशास्त्रज्ञ हा अभ्यास करीत आहेत. याअंतर्गत वन्यजीव संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. आर. सुरेश कुमार यांनी ८ नोव्हेंबर रोजी मणिपूरमध्ये दोन अमूर ससाण्यांवर 'सॅटलाईट टॅग' बसवले होते. त्यामधील नर ससाण्याचे नाव 'चिऊलुआन-२' आणि मादीचे नाव 'गुआनग्राम' ठेवण्यात आले. स्थानिक गावांच्या नावावरून ही नावे ठेवण्यात आली आहेत.

असा केला प्रवास
'चिऊलुआन-२' या ससाण्याने १४ नोव्हेंबररोजी प्रवास सुरू करून २७ नोव्हेंबर रोजी आफ्रिकेतील केनिया गाठले. प्रवास सुरू केल्यावर दुसऱ्याच दिवशी १५ नोव्हेंबर रोजी ओडिशामधील किनारी प्रदेश गाठला. तेथून तेलंगणामार्गे महाराष्ट्र गाठला. महाराष्ट्रात कडेगावमध्ये थांबा घेतला. दुसऱ्या दिवशी गुहागरमार्गे अरबी समुद्रात प्रवेश केला. समुद्रावरून थेट सोकोट्रा बेट गाठले. तेथून पूर्व आफ्रिकेतील सोमालिया प्रांतामध्ये प्रवेश केला. २७ नोव्हेंबर रोजी केनियामध्ये पोहोचला. हा सारा प्रवास त्याच्या पाठीवरील टॅगच्या मदतीने शास्त्रज्ञांनी नोंदविला. आता एप्रिल-मे महिन्यात आफ्रिकेतून त्याचा परतीचा प्रवास सुरू होईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.