वाराणसी : देश आज 21 व्या शतकात पोहचला असला तरीही अनेकजण अंधश्रद्धेला बळी पडताना दिसतात. वाराणसीतील भेलूपूरमधील भदायनी भागातील एक व्यावसायिक अंधश्रद्धेला बळी पडला आणि त्याने तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंबाला संपवल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.
तांत्रिकाच्या सांगण्यावरून भदायनी भागातील दारू व्यावसायिक राजेंद्र गुप्ता याने पत्नी नीतू गुप्ता (42), मुले नवेंद्र (20) आणि सुेंद्र (15), मुलगी गौरांगी (16) यांची गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर व्यावसायिक गायब झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत असतानाच व्यावसायिकाचा मृतदेह त्याच्या दुसऱ्या घराजवळ सापडला. यावेळी त्याच्या मृतदेहाजवळ एक पिस्तूलही सापडले. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्या केल्याची नोंद करून घेतली असून अधिक तपास करत आहेत.
ही संतापजनक घटना मंगळवारी (05 नोव्हेबंर) दुपारी व्यावसायिकाची मोलकरीण रेणू वर्मा ही त्यांच्या घरी कामावर आली असता उघडकीस आली. रेणू वर्माने सांगितले की, मी 5 वर्षांपासून या ठिकामी काम करत आहे. सर्व काही व्यवस्थित चालले होते. सोमवारी संध्याकाळी जेवण बनवायला आले, तेव्हा घरात दोनच मुलं होती. मी स्वयंपाक संपवला आणि 6.30 च्या सुमारास निघून गेले. यानंतर आज आले तेव्हा घराची बेल वाजवली, मात्र कोणीच दरवाजा उघडला नाही. त्यामुळे थोडासा धक्का देऊन दरवाजा उघडला. यावेळी घरात चार जणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. दरम्यान, व्यावसायिकाच्या घरात आता त्याची आई एकटीच उरली आहे. तिला वृद्धत्वामुळे याप्रकरणी नीट बोलता येत नाही आणि चालताही येत नाही.
शेजाऱ्यांनी सांगितले की, तांत्रिकाच्या सांगण्यावरून व्यावसायिकाने संपूर्ण कुटुंब संपवलं आहे. कारण तांत्रिकाने व्यावसायिकाला सांगितले होते की, त्याची पत्नी त्याच्या व्यवसायात अडथळा ठरत आहे. याच कारणामुळे व्यावसायिक दुसऱ्या लग्नाचाही विचार करत होता. त्यामुळे अनेकदा पती-पत्नीमध्ये भांडण होत होते. यापूर्वीसुद्धा याच घरात सहा जणांची हत्या झाल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे. व्यावसायिकाचे वडील, त्यांचा भाऊ व त्याची पत्नी आणि दोन रक्षकांची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी व्यापारी तुरुंगातही गेला होता. त्यामुळे आता पोलीस त्या तांत्रिकाचा शोध घेत आहेत. त्यामुळे आता तांत्रिकाचा शोध लागल्यावर याप्रकरणी अधिक माहिती समोर येईल.दरम्यान, व्यावसायिक राजेंद्र गुप्ता यांच्याकडे पैशांची कमतरता नव्हती. त्यांची शहरात चार घरे आहेत. यातील दोन घरांमध्ये प्रत्येकी 50 खोल्या आहेत. हत्या झालेल्या घरात 20 खोल्या असून त्याचे 80 हजार रुपये भाडे मिळत होते. तर 30 खोल्यांचे भाडे दोन लाखांपेक्षा जास्त होते. तसेच भदायनी येथील अन्य एका घरातूनही दोन लाखांहून अधिक भाडे मिळत होते. याशिवाय व्यावसायिकाचे देशी दारुचे दुकान आणि रिक्षा गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये 100 हून अधिक रिक्षा आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.