सांगली : कुरळप येथे पतीकडून पत्नीचा डोक्यात दगड घालून खून
कुरळप: वारंवार होत असलेल्या भांडणातून चिकुर्डे (ता. वाळवा) येथे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. संशयित आरोपी पती स्वतःहून कुरळप पोलिस ठाण्यात हजर झाला आणि खुनाची कबुली दिली.
कविता उत्तम पाटील (वय 42, रा. चिकुर्डे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, तर पती उत्तम विष्णू बुरसे-पाटील (वय 52, रा. चिकुर्डे) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मृत महिलेचा दीर नितेश विष्णू बुरसे-पाटील यांनी कुरळप पोलिसांत फिर्याद दिली आहे. खुनाच्या घटनेची माहिती गावात समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कविता व तिचा पती उत्तम या दोघांमध्ये विविध कारणांवरून वारंवार वाद होत असे. त्यातूनच हे कृत्य केल्याचे उत्तम याने पोलिसांना सांगितले. मंगळवारी सकाळी कविता या झोपल्या होत्या. सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास पती उत्तम याने पत्नी कविता त्यांच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये कविता यांचा जागीच मृत्यू झाला. कविता यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
पत्नीचा खून करुन पती उत्तम हा कुरळप पोलिस ठाण्यात गेला. दरम्यान, या घटनेची माहिती गावात पसरली. ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी गेली होती. काही वेळातच पोलिस घटनास्थळी आले आणि पंचनामा केला आहे. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुपारी कविता यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. या खुनाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.