मुंबई : विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे, गैरप्रकार थांबवा, नाहीतर कोणताही भेदभाव न करता आयोगाला कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिला.
लोकसभा निवडणुकीच्या काळात आयोग, पोलिस आणि अन्य संबंधित विभागांकडून मालमत्ता जप्तीची जी कारवाई करण्यात आली होती, त्यावर मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या विषयावर अधिक सतर्क आणि कठोर होऊन कारवाई सुरू झाली आहे. २०१९च्या पूर्ण विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात जेवढी मालमत्ता जप्त करण्यात आली होती, त्यापेक्षा अडीच पट मालमत्ता १५ ऑक्टोबरपासून आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे, असे सांगत चोक्कलिंगम यांनी गैरप्रकार करणाऱ्यांना इशारा दिला आहे.
प्रश्न : यावेळी प्रचारात धनशक्तीचा प्रचंड वापर होणार, असे म्हटले जात आहे. आयोगाचे त्याकडे कसे लक्ष आहे?
उत्तर : आमच्यासाठी सगळे पक्ष, सगळे नेते सारखेच आहेत. कोणाचीही गय केली जाणार नाही. मतदारांना वेगवेगळ्या प्रकारे आमिषे दाखविण्याच्या प्रकारांवर आमचे बारीक लक्ष आहे. आपल्यावर कोणाचा 'वॉच' नाही, असे कोणीही समजू नये.
प्रश्न : प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा कसा वॉच असेल?
उत्तर : महत्त्वाच्या सर्व शहरांमधील सर्व १०० टक्के मतदान केंद्रे ही वेबकास्टिंगद्वारे निवडणूक आयोगाचे कार्यालय, स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाशी जोडलेली असतील. विशिष्ट मतदान केंद्रांवर आता या क्षणी काय सुरू आहे, याचा 'आँखो देखा हाल' त्यांना मिळेल. प्रत्येक हालचालीवर लक्ष असेल. ग्रामीण भागातील ५० टक्के मतदान केंद्रे अशाच पद्धतीने जोडलेली असतील.
प्रश्न : मतदानाचा टक्का वाढावा म्हणून आपण कुठली पावले उचलली?
उत्तर : लोकसभा निवडणुकीला ९८ हजार मतदान केंद्रे होती, ही संख्या एक लाखावर गेली आहे. मुंबईसह मोठ्या शहरांमधील १५० हाैसिंग सोसायट्यांमध्येच लोकसभेला मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी एक हजाराहून अधिक हाैसिंग सोसायट्यांमध्ये मतदानाची सोय केली जाणार आहे. ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्ती आणि ८५ वर्षे वयावरील वृद्ध व्यक्तींना घरीच मतदान करता येईल.
प्रश्न : मतदान यंत्रणेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मतदानासाठी आपण कशी व्यवस्था केली आहे?
उत्तर : संरक्षण दलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोस्टल मतदानाची सोय आधीपासूनच आहे. यावेळी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदानाच्या आठ - दहा दिवस आधी पोस्टल मतदान करता येणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील सहा लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना २० नोव्हेंबरपूर्वीच मतदान करता येणार आहे.
आमच्यासाठी सगळे पक्ष, सगळे नेते सारखेच आहेत. कोणाचीही गय केली जाणार नाही. मतदारांना आमिषे दाखविण्याच्या प्रकारांवर आमचे बारीक लक्ष आहे.
- एस. चोक्कलिंगम,
मुख्य निवडणूक अधिकारी
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.