सांगली, दि.१५: हमाल तोलाइदार गाडीवान महिला कामगार अशा सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करीन. या सर्व माथाडी कामगारांना पेन्शन तसेच घरकुले मिळवून देण्यासाठीही काम करीन, अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली. सांगली मार्केट यार्डमधील हमाल, तोलाईदार, गाडीवान, महिला कामगार यांच्या प्रचंड जाहीर सभेत ते बोलत होते.
सुधीरदादांचे मार्केट यार्डमध्ये आगमन होताच त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ढोल, कैताळांच्या तालावर आणि भंडाऱ्याची उधळण करीत ही मिरवणूक निघाली होती. अग्रभागी महायुतीमध्ये सहभागी सर्व घटक पक्षांचे ध्वज फडकत होते. दादांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या जात होत्या.
आमदार गाडगीळ म्हणाले, माथाडी कायदा सांगली जिल्ह्यासह राज्यात पूर्ण ताकतीने राबवण्यासाठी मी शासनाकडे आग्रह धरीन. हमाल, तोलाइदार, महिला कामगार तसेच गाडीवान यांच्यासाठी पेन्शन आणि घरकुल योजना मंजूर व्हावी यासाठीही मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन. महायुती शासनाकडून या सर्व माथाडी कामगारांना पेन्शन आणि घरकुले मिळवून देईन.भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार म्हणाले, कष्टकरी कामगारांच्या या क्षेत्रात कुणी राजकारण आणू नये. भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार या सर्व कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे. सुधीरदादा गाडगीळ आणि आम्ही सर्व नेते माथाडी कामगारांसाठी काम करणाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू. माथाडी कामगारांची कुणीही दिशाभूल करू नये.
आमदार माजी आमदार दिनकरतात्या पाटील म्हणाले, गोरगरीब, कष्टकऱ्यांसाठी सुधीरदादा गाडगीळ नेहमीच मदतीचा हात पुढे करतात. आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी गोरगरिबांना काहीच दिले नव्हते.परंतु महायुती सरकारने लाडक्या बहिणींना पेन्शन, शेतकऱ्यांची वीज बिलामध्ये सवलत ,वयोवृद्ध नागरिकांना मदत अशा अनेक योजना राबवले आहेत. सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून आपण राज्य सरकारकडे लाडक्या बहिणींचे मानधन दरमहा तीन हजार रुपये करण्यासाठी खटपट करूया.
कष्टकऱ्यांच्या क्षेत्रात कुणी राजकारण आणू नये.
पैलवान दिलीप सूर्यवंशी म्हणाले, सुधीरदादा गाडगीळ माथाडी कामगारांचे सर्व प्रश्न सोडवतील. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तेच काम करतील. गोरगरीब हमाल,तोलाइदार, गाडीवान, महिला कामगार यांना कोणीही धमक्या देऊ नयेत. त्यांची दादागिरीची भाषा खपवून घेतली जाणार नाही.
भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज पवार म्हणाले, स्वर्गीय बापूसाहेब मगदूम, माजी आमदार प्रा. शरद पाटील आणि माजी आमदार संभाजी पवार यांनी काँग्रेसवाल्यांच्या झुंडशाहीला टक्कर देतच माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवले होते. त्याच भ्रष्ट आणि अन्याय करणाऱ्या काँग्रेसच्या दावणीला या कष्टकरी बांधवांना घेऊन बांधायचा कोणी प्रयत्न करू नये.ते खपवून घेतले जाणार नाही. सुधीरदादा गाडगीळ हे कष्टकऱ्यांसाठी नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या पाठीशी आपण भक्कम ताकद उभी करूया. ते आपले सर्व प्रश्न सोडवतील. काँग्रेसवाल्यांच्या नादी लागून कुणी कष्टकऱ्यांची दिशाभूल करू नये, अफवा पसरवू नयेत.
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव स्वाती शिंदे यांचेही भाषण झाले. माजी महापौर संगीता खोत उपस्थित होत्या. संघटनेचे अध्यक्ष संजय मोरे यांनी स्वागत केले. संघटनेचे उपाध्यक्ष राघू बंडगर यांच्या हस्ते सुधीरदादांचा सत्कार करण्यात आला. संभाजी सरगर,किरण रुपनर, सतीश फोंडे, प्रल्हाद वनमाने, बजरंग खुंटाळे, यशवंत सावंत आदि उपस्थित होते.
१)सांगली: मार्केट यार्डमध्ये हमाल, तोलाइदार, गाडीवान आणि महिला कामगारांच्या प्रचार सभेत बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ.२) सांगली: मार्केट यार्डमध्ये हमाल, तोलाईदार, गाडीवान महिला कामगारांच्या प्रचार सभेत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.