Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"संजय राऊतांच्या अंगातलं कधी उतरलंच नाही, म्हणून मविआचं सरकार गेलं"; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

"संजय राऊतांच्या अंगातलं कधी उतरलंच नाही, म्हणून मविआचं सरकार गेलं"; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य
 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. सध्या राज्यात प्रचाराच्या तोफा गाजताना दिसत आहे. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी उडताना दिसत आहेत. त्यातच आता महाविकासआघाडीतील एका नेत्याच्या वक्तव्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. “संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून सरकार बनलं, पण राऊतांच्या अंगातलं कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं”, असे विधान माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले.

 
माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार विश्वजित कदम हे सांगलीच्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले आहे. सध्या ते जोरदार प्रचार करताना दिसत आहे. नुकतंच विश्वजित कदम यांनी प्रचारसाठी सांगलीच्या कडेगाव तालुक्यात एक सभा आयोजित केली होती. या सभेदरम्यान मतदारांना संबोधित करतेवेळी माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी महाविकासाआघाडी आणि संजय राऊत यांच्याबद्द्ल एक मजेशीर वक्तव्य केले आहे. सध्या त्यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

“२०१९ ला सरकार येईल असं वाटतंच नव्हतं. पण २०१९ ला महाविकासआघाडीचं सरकार बनलं. मी विनोदाने अनेकदा म्हणतो की संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून सरकार बनलं. पण अडचण एवढी झाली की राऊतांच्या अंगातलं कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं. महाविकास आघाडीचं सरकार आलं. राहुल गांधी, सोनिया गांधींच्या आशीर्वादाने राज्यमंत्री झालो. सहा खाती मिळाली. पण दुर्दैवाने कोरोना सुरु झाला”, असे विश्वजित कदम म्हणाले. सांगलीच्या कडेगाव तालुक्यात प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते.
“महायुतीच्या नेत्यांनी ती कंपनी गुजरातला दिली”

“पॉस्कोन कंपनी महाराष्ट्र मध्ये येणार होती. यामुळे 2 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता. पण दिल्लीतून फोन आला आणि आमच्या महायुतीच्या नेत्यांनी ती कंपनी गुजरातला देऊन टाकली. आपला हा महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही. पण या महायुतीच्या नेत्यांनी पाप केले. या महाराष्ट्राला दिल्ली आणि गुजरात समोर झुकावे लागले. पण तुम्ही आमच्या पाठीशी उभा रहा, पुन्हा महाराष्ट्र कुणाच्या बापाच्या समोर झुकणार नाही”, असेही विधान विश्वजित कदम यांनी केले.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाचा कार्यक्रम कसा?
दरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाली आहे. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवार 29 ऑक्टोबर 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. यानंतर 30 ऑक्टोबर 2024 रोजी अर्जांची छाननी करण्यात आली. यानंतर 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. आता येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होईल.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.