विधानसभा निवडणुका संपल्यानंतर लगेचच महाराष्ट्र सरकारने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पदी नियुक्ती केली आहे. राज्याच्या गृहविभागाने सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी 5 नोव्हेंबर रोजी निवडणूक
आयोगाच्या आदेशानंतर वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती
करण्यात आली होती आणि रश्मी शुक्ला यांना रजैवर पाठवण्यात आले होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मागणीनंतर रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर ही जबाबदारी संजय वर्मा यांच्याकडे सोपवण्यात आली होती, त्यांना निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत या पदावर राहायचे होते, तर रश्मी शुक्ला यांना याच कालावधीसाठी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणूक निकाल जाहीर झाल्याने निवडणूक आयोगाने सोमवारी आदर्श आचारसंहिता संपल्याची अधिकृत घोषणा केली. दरम्यान, निवडणूक संपताच रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला होता. ही शुभेच्छा भेट होती, असे विधान माध्यमांशी बोलताना शुक्ला यांनी केले होते.
गृह विभागाच्या आदेशात म्हटले आहे की सरकारने रश्मी शुक्ला यांचा सक्तीच्या रजेचा कालावधी संपुष्टात आणला आहे आणि त्यांना पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे. संजय वर्मा यांनी त्यांच्याकडे पुन्हा पदभार सोपवला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.