मडगाव : अज्ञात क्रमांकावरून येणारे व्हिडीओ कॉल्स विवाहित महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. विवाहित महिलांची माहिती मिळवत व्हिडीओ कॉलद्वारे त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रकार होत आहेत.
महिलांनी व्हिडीओ कॉल स्वीकारल्यावर स्वतःच्या शरीराचा आक्षेपार्ह भाग दाखवत त्या महिलेचा चेहरा मोबाईलच्या स्क्रिनवर दिसू शकेल या पद्धतीने स्क्रिन रेकॉर्डिंग करत महिलांना पैशांसाठी ब्लॅकमेल करण्याचे प्रकार दक्षिण गोव्यात वाढल्याने खळबळ उडाली आहे. लोकलज्जेपोटी पैसे दिलेल्या सासष्टीतील एका महिलेचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर असे प्रकार उघडकीस येत आहेत.
मागील अनेक दिवसांपासून हे प्रकार चालू असून प्रतिष्ठित घराण्यातील कित्येक महिला या कारस्थानाच्या बळी ठरल्या आहेत. आपल्या कुटुंबाची नाहक बदनामी होईल या भीतीने पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली जात नाही. या स्कँडलला बळी पडलेल्या महिला निमूटपणे अत्याचार सहन करत असल्याने या टोळीला रान मोकळे झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासष्टीतील एका उच्च घराण्यातील एका निर्दया नावाच्या महिलेस (नाव बदलले आहे.) तिच्या मोबाईलवर सामान्य फोन येतो. समोरची व्यक्ती हिंदी भाषेतून संवाद साधत तिच्या नावाचा उल्लेख करत तिची विचारपूस करतो.
'निर्दया तुम कैसी हो, मुझे पहचाना नही क्या, असा प्रश्न तिला विचारतो. ती त्याचे नाव विचारते पण तो तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत तिच्या पतीचे नाव घेऊन त्याचा व आपला चांगला परिचय असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतो. कदाचित तो ओळखीचा असावा असे गृहीत धरून निर्दया त्याला प्रतिउत्तर देऊन फ़ोन ठेवते. पण लगेच तिच्या मोबाईलवर वॉट्सप व्हिडिओ कॉल येतो. पुढे घडणार्या घटनेची कोणतीही कल्पना नसलेली बिचारी निर्दया व्हिडिओ कॉल स्वीकारताच समोरचा व्यक्ति आपले गुप्तांगतिला दाखवतो. अचानक घडलेल्या त्या प्रकारामुळे ती गोंधळते. त्याच दरम्यान गुप्तांग आणि इन्सेटमध्ये तिचा चेहरा रेकॉर्ड केला जातो. नेमके काय घडले हे कळण्यापूर्वीच तिच्या मोबाईलवर एक व्हिडीओ पाठवला जातो. ज्यात निर्दया गुप्तांग पाहत आहे असे दिसते.
त्यानंतर तिला फोन करून 5 लाख रुपयांची मागणी केली जाते आणि पैसे न दिल्यास हा व्हिडिओ तिच्या पतीला पाठवण्याची धमकी दिली जाते. पतीने हा व्हिडिओ पहिल्यास तो गैरसमज करून आपल्याला दोषी धरणार या भीतीने निर्दया आपला संसार वाचवण्यासाठी 'त्या' व्यक्तीची मागणी मान्य करते आणि 'त्या'च्या खात्यावर 2 लाख रुपये पाठवते. पैसे मिळताच तिचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल करण्यात आल्याचे सांगितले जाते. अशा प्रकारच्या घटनांमुळे महिलांममध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अनर्थ टळला...
मडगावात अन्य एका विवाहित महिलेबाबतही असाच प्रकार घडला आहे. तिने प्रसंगावधान राखून व्हिडिओ कॉलवर आपला चेहरा येऊ दिला नाही, त्यामुळे अनर्थ टळला. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी स्वता लक्ष घालून तो क्रमांक तपासला असता त्या क्रमांकाची नोंदणी आसाम तर लोकेशन दिल्लीत आढळले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.