जयंतरावांचा विजय पराभवासारखाच!
इस्लामपूर : गावोगावचे जयंतरावांचे दोन-तीन गट, 35 वर्षांनंतर हीच परिवर्तनाची वेळ, ऊस दराचा प्रश्न, लाडक्या बहिणींची ओवाळणी; अशा विरोधकांच्या अनेक मुद्यांना इस्लामपूर मतदारसंघातील मतदारांनी साद घालत निशिकांत पाटील यांना घसघशीत मतदान केले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सप्तपदीनंतर आठव्यांदा विधानसभेवर अगदी निसटत्या मतांनी पाठवले; पण त्याचवेळी त्यांच्यावर आत्मपरीक्षणाची वेळ आजच्या निकालाने आणली.
माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आक्रमक आणि दमदार वाटचाल सुरू ठेवून सर्व विरोधकांना एकवटण्याचे सामर्थ्य तर दाखवलेच, पण मतदारसंघात पारंपरिक सत्तारूढांना शह देण्याची परिवर्तनाची नांदी सुरू होतेय, असे संकेतदेखील देऊन टाकले. प्रतिष्ठेच्या लढतीत जयंत पाटील यांना 13 हजारांहून अधिक मताधिक्याने सलग 8 व्यांदा आमदार केले. मतदारसंघातील सर्व विरोधकांनी एकत्रित येत चुरशीच्या बनविलेल्या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनीदेखील तितक्याच ताकतीने विरोधी मतप्रवाहांचा आश्वासक चेहरा बनून अतिशय जोरदार लढत दिली.
माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी 7 वर्षांपासून मतदारसंघातील सर्व गावांमध्ये बूथनिहाय सर्वेक्षण आणि तशा पद्धतीने व्यूहरचना सुरू केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून इस्लामपूर व परिसरासाठी निधी आणून विकास कामांमध्ये लक्ष घातलेले शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, तसेच हुतात्मा समूहातून गौरव नायकवडी आदींनी निवडणुकीच्या उंबरठ्यावर उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. निशिकांत पाटील यांनी सर्व विरोधकांची मोट जुळवून आणण्यास प्रारंभ केला. माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत, शिवसेनेचे आनंदराव पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील, भाजपचे राहुल व सम्राट महाडिक, हुतात्मा समूहाचे वैभव नायकवडी, गौरव नायकवडी, भाजपचे विक्रम पाटील, काँग्रेसचे वैभव पवार, भीमराव माने, आष्टा येथून प्रवीण माने यांच्याबरोबरच ऐन निवडणुकीच्या उंबरठ्यावर निशिकांत पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केलेले माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे आणि जयवंत पाटील अशा अनेकांची साथ विरोधकांचा आवाज वाढवत गेली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद घेऊन निशिकांत यांनी शड्डू ठोकला.
जयंत पाटील यांच्यासोबत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, मतदारसंघातील शहाजी पाटील, उद्योजक सुरेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विजय पाटील, अॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव, अॅड. धैर्यशील पाटील यांच्यासह जयंतरावांचे दोन्ही सुपुत्र प्रतीक आणि राजवर्धन, कोरेगाव परिसरातून बी. के. पाटील तसेच आष्टा येथून वैभव शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, इस्लामपुरातून कपिल व अमित ओसवाल बंधू, काँग्रेसचे बाळासाहेब पाटील असे अनेकजण अतिशय बारकाव्याने प्रचारयंत्रणा हाताळत होते. राजारामबापू शिक्षण आणि उद्योग समूहातील तसेच राष्ट्रवादीचे गावोगावचे निष्ठावंत, तसेच प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या शहर आणि तालुका महिला पदाधिकारी अखेरपर्यंत सक्रिय राहिल्याचे दिसले. परंतु राज्यातील महायुतीच्या लाटेने तडाखा दिल्याचे दिसले. जयंत पाटील यांनी एक लाखाचा मतांचा आकडा (गतवेळची मते एक लाख पंधरा हजार) टिकवला असला तरी, एक लाखापर्यंत म्हणजे 97 हजारापर्यंत निशिकांत पाटील यांनी मारलेली मजल, ही परिवर्तनाची नांदी असू शकते. सत्तारूढांना शह देण्याजोगी, आव्हान निर्माण करण्याजोगी विरोधकांची ताकद तयार झाल्याचेही चित्र निकालात दिसले. हे चित्र विरोधकांचा आशावाद टिकविणारे तर आहेच, त्याचबरोबर विरोधी मतप्रवाहांचा हा आवाज न दबणारा आणि न दुर्लक्ष करण्यासारखा आहे; हे देखील तितकेच खरे!
टोकाची टीका, संघर्ष नाही
इस्लामपूर मतदारसंघात अपवाद वगळता फार टोकाचा संघर्ष आणि टोकाचे आरोप दिसले नाहीत. त्यापेक्षा सुसंस्कृत आणि विधायक, पण काहीशा भावनिक मुद्यांवर प्रमुख दोन्ही उमेदवारांनी आणि वक्त्यांनी प्रचार सभांमध्ये सभ्यता पाळल्याचेही यानिमित्ताने दिसून आले. अर्थात या निकालाने जयंतरावांच्या करेक्ट कार्यक्रमाला जनतेने काहीसे बाजूला केल्याचे दिसले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.