गौतम अदानींवर अमेरिकेत लाच आणि फसवणूक प्रकरणी आरोप निश्चित
बुधवारी (20 नोव्हेंबर) न्यूयॉर्कमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. गौतम अदानी 62 वर्षांचे असून त्यांचा उद्योग प्रचंड मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला आहे.
सध्या अदानी समूह हा बंदर विकास, विमानतळ, रस्ते, उर्जा, अक्षय उर्जा, वाहतूक, गॅस वितरण, रिअल इस्टेट, एफएमसीजी आणि आर्थिक सेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये विस्तारलेला आहे. अलीकडेच या समूहाने माध्यम व्यवसायातही प्रवेश केला आहे. अमेरिकेतील सरकारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी केलेल्या आरोपानुसार, अदानी आणि त्यांच्या कंपनीच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या अक्षय्य उर्जा (रिन्यूएल एनर्जी) कंपनीला काँट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना पैसे देण्यास सहमती दर्शवली होती.
या काँट्रॅक्टच्या माध्यमातून कंपनीला येणाऱ्या 20 वर्षांमध्ये दोन अब्ज डॉलरहून अधिकचा नफा होण्याची शक्यता आहे. अदानी ग्रुपने या सगळ्या आरोपांबाबत अद्याप तरी प्रतिक्रिया किंवा कोणतंही उत्तर दिलेलं नाही. गेल्या काही महिन्यांपासूनच या फसवणुकीबाबत तसेच लाचखोरीच्या प्रकरणातील तपासाबाबतच्या बातम्या येत होत्या. अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी असं म्हटलं आहे की, या प्रकरणाचा तपास 2022 मध्येच सुरु करण्यात आला होता.
अदानी ग्रुपवरचा मुख्य आरोप असा आहे की, त्यांच्या व्यवस्थापकांनी कर्ज आणि बॉन्ड्सच्या स्वरुपात तीन अब्ज डॉलर जमा केले होते. लाचलुचपतविरोधी धोरणांविरोधात दिशाभूल करणारी विधाने करून हा पैसा उभारण्यात आल्याचा त्यांचा मुख्य आरोप आहे.
अमेरिकन अटॉर्नी ब्रियॉन पीस यांनी आरोपांमध्ये म्हटलं की, "आरोपींनी काही अब्ज डॉलरचा काँट्रॅक्ट प्राप्त करण्यासाठी भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याची एक गुप्त योजना केली होती, असा आरोप झाला होता. त्यासोबतच, या लाचखोरीच्या योजनेबाबत दिशाभूल करणारी विधाने करण्यात आली. कारण, ते अमेरिकन आणि जागतिक गुंतवणूकदारांकडून भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत होते."
पुढे ब्रियॉन पीस यांनी असंही म्हटलं की, "माझं कार्यालय आंतरराष्ट्रीय बाजारातून भ्रष्टाचार संपूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे. सोबतच, जे आपल्या आर्थिक बाजाराची विश्वासार्हता पणाला लावून स्वत:ला गडगंज बनवू इच्छित आहेत, त्यांच्यापासून गुंतवणूकदारांना वाचवण्याची गरज आहे."
लाचखोरीचे हे नियोजन तडीस नेण्यासाठी अनेकवेळा स्वत: अदानी यांनी सरकारी अधिकाऱ्यांचीही वारंवार भेट घेतली, असंही आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. गौतम अदानी हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नीकटवर्तीय असल्याचं मानलं जातं. भारतातील विरोधी पक्षांकडून गेल्या अनेक वर्षांपासून हाच आरोप केला जातो की, राजकीय संबंधांमुळेच अदानींना प्रचंड मोठ्या प्रमाणावर फायदा मिळवून दिला जात आहे. मात्र, अदानी ग्रुपने वारंवार या प्रकारचे आरोप फेटाळून लावले आहेत.
अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षचं अटॉर्नीची नियुक्ती करतात. अगदी अलीकडेच अमेरिकेमध्ये निवडणूक पार पडली असून तिथे रिपब्लिकन पक्षाचं सरकार सत्तेत आलं आहे. या पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. अशा पार्श्वभूमीवर हे प्रकरण उघड झालं आहे. नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या न्याय विभागामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याविषयी अलीकडेच भाष्य केलं आहे. गेल्या आठवड्यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून गौतम अदानी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विजयाच्या सदिच्छाही दिल्या होत्या. या सदिच्छांसोबतच अमेरिकेमध्ये 10 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणाही केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.