'बिम्स'मध्ये महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू; रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बळी?
बेळगाव : येथील 'बिम्स' रुग्णालयातील प्रसूती विभागामध्ये दाखल झालेल्या महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणामुळे रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला होता.
मंगळवारी (ता. १९) बाळंतिणीचा मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयासमोर आंदोलन केले. त्यामुळे रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला होता.या प्रकरणामुळे रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा व देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता तिघा जणांची चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्पना अनिल लमानी (वय २६, रा. नांगनूर तांडा, ता. रामदुर्ग) असे प्रसूतीनंतर मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
मंगळवारी मध्यरात्री 'बिम्स' रुग्णालयाच्या प्रसूती विभागामध्ये सिजेरियनद्वारे महिलेची प्रसूती झाली होती. बाळाला जन्म दिल्यानंतर महिलेची प्रकृती स्थिर होती, मात्र मंगळवारी अचानक तब्येत बिघडल्याने तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी केला आहे, तर महिलेच्या देखभालीकडे दुर्लक्ष केलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत नातेवाइकांनी आंदोलन केले.
रात्री उशिरापर्यंत नातेवाइकांनी रुग्णालयासमोर आंदोलन केल्याने एकच गदारोळ माजला होता. रक्तदाब कमी झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. यावर समाधान न झालेल्या नातेवाइकांनी उशिरापर्यंत आंदोलन सुरू ठेवले होते.
आश्वासनानंतर आंदोलन मागे
दरम्यान, 'बिम्स' संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन जणांच्या समितीची रचना करण्यात येईल. चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. याबरोबर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.