Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रातल्या निवडणुकीतले हे 7 प्रमुख धक्कादायक निकाल


महाराष्ट्रातल्या निवडणुकीतले हे 7 प्रमुख धक्कादायक निकाल


विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं निकालातून समोर आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला 50 च्या आसपास जागा मिळत आहेत.

त्याचबरोबर या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालही लागले आहेत.
काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण असे मोठे नेते पराभूत झालेत. तर बच्चू कडू यांसारख्या नेत्यांनाही पराभवाचा सामना करवा लागला आहे.

अशाच राज्यातील काही धक्कादायक निकालांवर एक नजर टाकूयात.

संगमनेर - बाळासाहेब थोरात

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांसारख्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा झटका बसला आहे.

संगमनेरमध्ये शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा 10 हजार 560 मतांनी पराभव केला आहे. त्यांना एकूण 1 लाख 12 हजार 386 मतं मिळाली तर काँग्रेसचे मातब्बर नेते बाळासाहेब थोरात यांना 1 लाख 1 हजार 826 मतं मिळाली.

खरंतर एक्झिट पोल्स, वृत्तवाहिन्या, राजकीय विश्लेषकांनी देखील काँग्रेसच्या या पराभवाचं भाकीत वर्तवलं नव्हतं. मात्र भाजपमधून शिवसेना शिंदे गटात आलेल्या तरुण अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांना पराभवाची धूळ चारली आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार संगमनेरमध्ये 75.19% मतदान झालं होतं. वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीने अमोल खताळ यांना मदत केल्याचं सध्यातरी दिसत आहे.

लोकसभेत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा झालेला हा पराभव नक्कीच धक्कादायक आहे. संगमनेर तालुक्यातील सहकार क्षेत्रावर बाळासाहेब थोरातांचं एकहाती नियंत्रण आहे.

त्यांनी तालुक्यात सहकारी साखर कारखाना, दूध उत्पादक संघ, शाळा, महाविद्यालये, इंजिनियरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज असं संस्थांचं मोठं जाळं निर्माण केलं आहे. असं असतानाही बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण

राज्यात पुन्हा एकदा भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता येणार हे आता स्पष्ट झालं आहे. 23 ऑक्टोबरला जाहीर झालेल्या निवडणूक निकालात बहुतांश एक्झिट पोल्सचे अंदाज खोटे ठरवत महायुतीने मोठा विजय मिळवला आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत मात्र मोठा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा 39 हजार 355 मतांनी पराभव केला आहे.

अतुल भोसले यांना एकूण 1 लाख 39 हजार 505 मतं मिळाली असून, पृथ्वीराज चव्हाण यांना 1 लाख 150 मतं मिळाली आहेत. एकूणच राज्यभर मतदारांनी काँग्रेसच्या विरोधात दिलेला कौल कराड दक्षिणमध्येही कायम राहिलेला दिसून येतो.

2014 साली पृथ्वीराज चव्हाण या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले होते. 2019 मध्येही अटीतटीच्या लढतीत त्यांनी 9 हजार 130 मतांनी अतुल भोसले यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत अतुल भोसले यांनी पराभवाची परतफेड केली आहे.

माहीम - अमित ठाकरे

आदित्य ठाकरेंच्या पाठोपाठ निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य म्हणजे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे.

अमित ठाकरे पाचव्या फेरीच्या मतमोजणीनंतर तिसऱ्या क्रमांकावर असल्यानं त्याबाबत चर्चा होत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत सध्या 7636 मतांनी आघाडीवर आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सदा सरवणकर तर अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर आहे.

अमित ठाकरे यांना भाजपनं पाठिंबा दर्शवला होता. तरीही एकनाथ शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी अर्ज दाखल केला होता.

सरवणकर यांच्यावर अर्ज मागे घेण्यासाठी दबावही आणण्यात आला होता. त्यानुसार सदा सरवणकर राज ठाकरेंना भेटायलाही गेले.

पण राज ठाकरेंनी भेट नाकारल्यानं त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. अखेर याचा फटका बसल्यानं अमित ठाकरेंची पिछेहाट झाल्याचं, म्हटलं जात आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारानं अमित ठाकरेंचा पराभव केला. आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीत उभे राहिले त्यावेळी मनसेनं वरळीमध्ये उमेदवार दिला नव्हता. पण उद्धव ठाकरेंनी आमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिला होता. त्याचीही बरीच चर्चा झाली होती.

वांद्रे-पूर्व - झिशान सिद्दिकी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.

ठाकरेंच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी झिशान सिद्दीकी यांचा 11 हजार 365 मतांनी पराभव केला असून.

बाबा सिद्दिकी यांच्या मृत्यूनंतर सहानुभूतीच्या बळावर झिशान सिद्दीकी निवडून येतील असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता पण पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या वरुण सरदेसाई यांनी झिशान सिद्दीकी यांचा पराभव केला आहे.

ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाई यांना 57 हजार 708 मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या झिशान सिद्दीकी यांना 46 हजार 343 मतं मिळाली आहेत.

निवडणुकीच्या काही महिनेआधी बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांचा हा पक्षबदल त्यांच्या मतदारांना रुचला नाही असं दिसतंय. झिशान सिद्दीकी यांनी संपूर्ण प्रचारयंत्रणेत पंतप्रधान मोदींचा फोटोदेखील वापरला नाही अशी चर्चा होती.

तिवसा मतदारसंघ - यशोमती ठाकूर

काँग्रेसच्या आणखी एक मोठ्या नेत्या यशोमती ठाकूर यांनाही या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या राजेश वानखेडे यांनी यशोमती ठाकूर यांचा पराभव केला.

राजेश वानखेडे यांना 99664 मते मिळाली. तर यशोमती ठाकूर यांना 92047 मते मिळाली. यशोमती ठाकूर सलग तीन वेळा तिवसा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांची विजयी कामगिरी रोखण्यात भाजपला यश आलं.

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेल्या ठाकूर अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्रीही होत्या. महायुती सरकारवर आक्रमकपणे टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता.

सलग तीनवेळा आमदार राहिलेल्या ठाकूर यांच्यावर मतदारसंघात कामं झालेली नसल्यानं मतदारांची नाराजी होती. तसंच अमरावती मतदारसंघात झालेल्या ध्रुवीकरणाचाही त्यांना फटका बसल्याचं सांगितलं जातं.

वसई मतदारसंघ - हितेंद्र ठाकूर

वसई मतदारसंघाचं सहा वेळा नेतृत्व केलेले बहुजन विकास आघाडी पक्षाचे हितेंद्र ठाकूर यांना यावेळी मात्र निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपच्या स्नेहा पंडित यांनी हितेंद्र ठाकूर यांचा 3153 मतांनी पराभव केला.

निवडणुकीसाठी प्रचार थंडावल्यानंतर घडलेल्या एका घटनेनं हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर हे अचानक चर्चेत आले होते.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना एका हॉटेलमध्ये ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं.

हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांचाही निवडणुकीत पराभव झाला आहे. भाजपच्या राजन नाईक यांनी नालासोपारा मतदारसंघातून 36875 मतांनी त्यांचा पराभव केला.

पालघर जिल्ह्यातल्या वसई-विरार विधानसभा मतदारसंघातून 1990च्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते आणि पुढे त्यांनी वसई विकास मंडळ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. याच पक्षाचं नाव बदलून पुढे बहुजन विकास आघाडी असं करण्यात आलं.

अचलपूर - बच्चू कडू

विधानसभा निवडणुकांमधील आणखी एक धक्कादायक पराभव म्हणजे बच्चू कडू यांचा. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांचा प्रवीण तायडे यांनी अचलपूर मतदारसंघातून पराभव केला.

बच्चू कडू हे 2004 पासून सलग चार वेळा अचलपूर मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र त्यांची विजयाची मालिका या निवडणुकीत खंडीत झाली.

अचलपूरमध्ये भाजपचे प्रवीण तायडे यांना 78201 मते मिळाली तर बच्चू कडू यांना 66070 मतं मिळाली. त्यांचा 12131 मतांनी पराभव झाला. तर काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांनी 15410 मतं मिळवली.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड करत गुवाहटी गाठली होती, त्यावेळी बच्चू कडू आणि त्यांच्या सोबत इतर काही अपक्ष आमदारही मविआच्या सरकारमधून बाहेर पडले होते.

पण नंतरच्या काळात बच्चू कडूंना सत्तेत वाटा मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी महायुतीची साथ सोडत एकला चलो रे ची भूमिका घेतली होती.

बच्चू कडू यांनी लोकसभेलाही महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली होती. विधानसभा निवडणुकीत तर युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या साथीनं परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी स्थापन केली होती.

पण या आघाडीला विधानसभेत यश मिळालेलं दिसलं नाही. उलट बच्चू कडू यांना पराभवाचा सामना करावा लागला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.