त्याने एकाच घरातले 5 जण संपवले, डोकं चक्रावणारी रिअल स्टोरी
मुंबई: 'एखाद्या लहान मुलाच्या डोळ्यांसमोर त्याच्या कुटुंबातल्या लोकांची हत्या होते. तो मुलगा सर्व गुन्हेगारांचे चेहरे लक्षात ठेवतो. मोठं झाल्यानंतर हाच मुलगा त्या गुन्हेगारांचे जीव घेऊन कुटुंबातल्या लोकांच्या हत्येचा बदला घेतो...' आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अशा प्रकारचं कथानक आपण बघितलेलं असेल; मात्र वाराणसीमध्ये हा प्रकार प्रत्यक्षात उतरल्याची चर्चा रंगली आहे.
5 नोव्हेंबर रोजी शहरात झालेल्या पाच खुनांच्या वर्णनासाठी 'गँग्ज ऑफ वासेपूर' या प्रसिद्ध सिनेमामधला 'बाप का, दादा का, भाई का सबका बदला लेगा रे तेरा फैजल' हा डायलॉग वापरला जात आहे. या पाच खुनांचा 27 वर्षांपूर्वी झालेल्या चार खुनांशी संबंध असल्याचं म्हटलं जात आहे. अशी चर्चा रंगली आहे, की 27 वर्षांपूर्वी एका मुलाने आई-वडील आणि आजोबांचा खून बघितला होता. त्याच मुलाने आता आरोपींना जीवे मारलं आहे.
काय आहे प्रकरण?
वाराणसीतला कोट्यधीश आणि दारू व्यावसायिक राजेंद्र गुप्ताच्या घरात 5 नोव्हेंबर रोजी मोठी घटना घडली. त्याची पत्नी नीतू गुप्ता, मोठा मुलगा नवनेंद्र, धाकटा मुलगा सुबेंद्र आणि मुलगी गौरांगी यांना गोळ्या घालून मारण्यात आलं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. प्रत्येकाच्या डोक्यात आणि छातीवर प्रत्येकी एक-एक गोळी मारण्यात आली होती. घराचा प्रमुख राजेंद्र गुप्ता बेपत्ता होता. कुटुंबीयांना मारून राजेंद्र फरार झाला असावा असा पोलिसांना संशय आला.
पोलिसांनी त्याच्या मोबाइलचं लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली असता ते मीरापूर-रामपूर गावात आढळलं. मोबाइलच्या लोकेशनचा माग काढत पोलीस एका बांधकाम सुरू असलेल्या घरात पोहोचले. तिथे राजेंद्र गुप्ताचा निर्वस्त्र अवस्थेतला मृतदेह पडला होता. कुटुंबातल्या इतरांप्रमाणेच त्याच्याही डोक्यात आणि छातीत प्रत्येकी एक गोळी मारलेली होती. राजेंद्रचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणातला आरोपी कोणी दुसराच असल्याचं स्पष्ट झालं.
पोलिसांनी राजेंद्रची आई शारदादेवी यांच्याकडे चौकशी सुरू केली. या घटनेमागे आपला नातू आणि राजेंद्रचा पुतण्या विशाल उर्फ विकी गुप्ता याचा हात असल्याचा संशय शारदा देवी यांनी व्यक्त केला. 1997मध्ये घडलेली एक घटना यासाठी कारणीभूत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राजेंद्र गुप्ताचे वडील लक्ष्मी नारायण गुप्ता बनारसमधले मोठे व्यावसायिक होते. त्यांचा प्रॉपर्टी आणि दारूचा व्यवसाय होता. त्यांना राजेंद्र गुप्ता आणि कृष्ण गुप्ता ही दोन मुलं होती. मोठा मुलगा राजेंद्रची वागणूक लक्ष्मी नारायण यांना पटत नव्हती. त्यामुळे त्यांनी आपल्या व्यवसायाचा जास्त भाग धाकटा मुलगा कृष्णाला दिला. रागाच्या भरात राजेंद्रने धाकटा भाऊ कृष्णा गुप्ता आणि त्याच्या पत्नीला झोपेत गोळ्या घालून ठार केलं. या गुन्ह्यासाठी राजेंद्र सहा वर्षं तुरुंगातदेखील गेला. 2003 मध्ये पॅरोलवर तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याने पैसे देऊन वडील लक्ष्मी नारायण आणि त्यांच्या पर्सनल सिक्युरिटी गार्डची हत्या करवून घेतली. त्यानंतर अनेक वर्षं लोटली. 27 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती 5 नोव्हेंबर 2024 रोजी झाली.प्रकरणातले काही योगायोग आश्चर्यचकित करणारे आहेत. राजेंद्रने भाऊ कृष्णा आणि त्याच्या पत्नीची हत्या केली होती, तेव्हा त्याने दोघांना दोन-दोन गोळ्या घातल्या होत्या. आता राजेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांनादेखील प्रत्येकी दोन-दोन गोळ्या घालण्यात आल्या आहेत. कृष्णा आणि त्याच्या पत्नीची हत्या झाली तो दिवस मंगळवार होता. राजेंद्रचा खूनदेखील मंगळवारीच झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी आणि त्याचा भाऊ जुगनू दोघेही दिल्ली एनसीआरमध्ये काम करतात. या घटनेनंतर जुगनू बनारसला आला; मात्र विकीचा पत्ता लागला नाही. पोलिसांनी विकीबाबत माहिती गोळा केली. त्याच्या डोक्यात राजेंद्र गुप्ता आणि त्याच्या कुटुंबीयांना मारण्याचा प्लॅन होता, ही बाब तपासात समोर आली. पोलिसांनी विकीच्या मेव्हण्याला नोएडातून ताब्यात घेतलं. त्याने चौकशीदरम्यान सांगितलं, की विकी या दिवाळीत काका आणि त्याच्या कुटुंबाला मारणार होता.
दरम्यान, विकी काही काळ तमिळनाडूमध्ये होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. वेल्लोरमध्ये राहून त्याने बीटेकचं शिक्षण घेतलं होतं. पोलिसांच्या एका पथकाने वेल्लोरला जाऊन विकीचे चार मित्र आणि त्याच्या प्रेयसीची चौकशी केली. आतापर्यंतच्या तपासात विकीचा राजेंद्र गुप्ता आणि त्याच्या कुटुंबीयांच्या हत्येशी संबंध असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत. पोलीस विकीचा शोध घेत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.