पत्त्यांच्या खेळातील 4 पैकी एका राजाला मिशी का नसते?
नवी दिल्ली : जगाच्या वेगवेगळ्या भागात पत्ते हा खेळ हा विविध पद्धतीने आणि नियमांनुसार खेळला जातो. पत्ते खेळण्याचे प्रकार वेगवेगळे असले तरी पत्ते हे एकाच प्रकारचे असतात. पत्त्यांच्या सेटमध्ये 52 कार्ड आहेत. या कार्डांमध्ये 4 राजे असतात. या राजांचे प्रकार देखील वेगवेगळे आहेत. या राजांची एक खास गोष्ट आहे. 4 कार्डांपैकी 3 कार्डांवरील राजांना मिशा आहेत तर एकाला मिशा नाहीत. याचं खरं कारण काय आहे, याचा कधी विचार केला आहे का? या विषयीची माहिती जाणून घेऊया.
सर्वप्रथम, पत्त्यांबाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. पत्त्यांमध्ये 52 कार्ड असतात. यात एक्क्यापासून 10 पर्यंत तसेच राजा, राणी आणि गुलाम असे पत्ते असतात. या पत्त्यांचे चार प्रकार असतात. त्यात इस्पिक, किल्वर, बदाम आणि चौकट यांचा समावेश असतो. याचा अर्थ प्रत्येकी चार प्रकारची 13 अशी एकूण 52 कार्ड असतात. या चारही प्रकारांत राजाचे चित्र असलेला पत्ता असतो. पण बदाम राजाचा चेहरा हा इतर तीन राजांपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. त्याला मिशी नसते.
जवळपास सर्वच पत्त्यांमध्ये बदाम राजाचा लूक हा असाच असतो. वृत्तानुसार, जेव्हा पत्त्यांचा खेळ सुरू झाला होता, तेव्हा बदाम राजाला मिशी असायची. Technology.org वेबसाईटनुसार आज जे पत्ते अस्तित्वात आहेत, त्याचे डिझाईन 15 व्या शतकात फ्रान्समध्ये तयार केलं गेलं होतं.अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, ती म्हणजे राजाच्या हातात खंजीर आहे. हे देखील लाकडाच्या शिक्क्यामुळे झालं आहे. लाकडाच्या शिक्क्याचा परिणाम मिशीसह राजाच्या हातातील कुऱ्हाडीवर पण झाला. सुरुवातीला बदाम राजाच्या हातात कुऱ्हाड होती. पण शिक्क्यावरून कॉपी करताना कुऱ्हाडीचं चित्र पुसट झालं आणि हातात चाकूसारखं लाकूड दिसू लागलं. तेव्हापासून बदाम राजाच्या हातातील कुऱ्हाडीची खंजीर झाली. आता हे डिझाईन पाहिल्यावर राजा स्वतःच्या शरीरात चाकू खुपसतोय असं वाटतं. त्यामुळे बदाम राजाला 'सुसाईड किंग' देखील म्हटलं जातं.
त्यावेळी राजांना मिशी असायची. त्यावेळी लाकडी शिक्क्यांचा वापर करून पत्त्यांचं डिझाईन कॉपी केलं जायचं. त्यानंतर ते हाताने कोरलं जात असे. त्यावेळी लाकडी शिक्के खराब होत आणि डिझाईन फिकट होत असे. असंच काहीसं बदाम राजाच्या शिक्क्याबाबत झालं. कालापरत्वे लाकडावरून मिशीची खूण गायब झाली आणि डिझायनरने हा पत्ता मिशीविना डिझाईन केला. ही परंपरा पुढे कायम राहिली. काही देशांनी त्यांच्या पद्धतीने डिझाईनमध्ये बदल केला. पण मूळ डिझाईन आजही कायम आहे. रशियातील पत्त्यांत बदाम राजाला मिशी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.