कडेगाव : बोंबाळेवाडी (शाळगाव, ता. कडेगाव) येथील एमआयडीसीतील मॅनमार कंपनीत विषारी वायुगळतीमुळे महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, दि. 21 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
बोंबाळेवाडी एमआयडीसीमध्ये मॅनमार ही रासायनिक खते तयार करणारी कंपनी आहे. गुरुवारी सायंकाळी येथील गळतीमुळे विषारी वायू एमआयडीसी परिसर आणि शेजारच्या वस्तीवर पसरला. यामुळे श्वास घेताना अडचण, डोळ्यात जळजळ आणि उलट्या होऊन गंभीर त्रास होऊ लागल्याने कंपनीतील चार कामगार व परिसरातील सहा नागरिक अशा दहा जणांना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत जवळच्या वस्तीवरील एका महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य नऊजणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत महिलेचे नाव रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.गळतीमुळे कंपनीतील कर्मचार्यांसोबतच परिसरातील नागरिकांनाही त्रास होऊ लागला. परिसरातील लोकांत घबराट पसरली आणि लोक जीव मुठीत घेऊन धावू लागले. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, कडेगावचे तहसीलदार अजित शेलार आणि पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. त्यानंतर संबंधित अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या. गळती झालेला वायू कोणता होता, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. यासंदर्भात तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे. वायुगळतीमुळे बोंबाळेवाडी, रायगाव आणि शाळगाव परिसरातील नागरिकांना त्रास झाल्याचे समजते. नागरिकांनी दक्षतेचा उपाय म्हणून मास्कचा वापर केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.