कुली म्हणून करायचे काम, मोफत Wifi च्या मदतीने अभ्यास करून दिली UPSC परीक्षा अन् झाले IAS अधिकारी
भारतातील असंख्य लोक दरवर्षी अनेक स्पर्धा परीक्षा देतात. त्यासाठी दिवस-रात्र ते प्रचंड मेहनतही घेतात. ते आयुष्यातील अनेक संकटांवर मात करण्याचा प्रयत्न करीत, अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात.
पण, बऱ्याचदा काहींना त्यात लवकर यश मिळत नाही; पण तरीही खचून न जाता, काही जण परीक्षा उत्तीर्ण करतात. यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो. पण प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर सर्व काही साध्य करता येते. केरळमधील एर्नाकुलम रेल्वेस्थानकावर कुली म्हणून काम करणाऱ्या श्रीनाथ यांची कथाही अशीच आहे; जी अनेकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. श्रीनाथ हे एर्नाकुलम रेल्वेस्थानकावर कुली म्हणून काम करायचे. पण, त्यांच्या या कामातून मिळालेल्या पैशांतून ते त्यांच्या मुलीला चांगले शिक्षण देऊ शकत नव्हते. आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी त्यांनी यूपीएससीसारखी कठीण परीक्षा देण्याचे ठरवले.
मोफत Wifi च्या मदतीने केला अभ्यास
परंतु, गरीब परिस्थिती आणि कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे श्रीनाथ परीक्षेसाठी कोणत्याही क्लासचा आधार घेऊ शकले नव्हते. पण, रेल्वेस्थानकावर त्यांना मोफत Wifiची सुविधा असल्याने त्यांनी त्या परीक्षेसाठी स्वत:च नेटाने अभ्यास सुरू केला. स्टेशनवर ते कानात इअरफोन घालून, ऑनलाइन स्टडी मटेरियल व लेक्चर्स ऐकायचे, नोट्स काढायचे आणि रात्रंदिवस मेहनत करायचे. सुरुवातीला श्रीनाथ यांनी केरळ लोकसेवा आयोग (केरळ पीएससी) परीक्षेला लक्ष्य केले आणि आपल्या मेहनतीने त्यात यश संपादन केले. या यशामुळे त्यांच्या वाढलेल्या आत्मविश्वासाने आपण काहीतरी ‘मोठे’ साध्य करू शकतो, या उमेदीला बळ मिळाले. त्याच जोरावर त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
चौथ्या प्रयत्नात मिळवले यश
श्रीनाथ UPSC च्या खडतर परीक्षेत तीन वेळा अनुत्तीर्ण झाले; पण जिद्दी व्यक्तीला अपयश आणखी कणखर बनविते, असे म्हणतात. श्रीनाथ यांनीही हार न मानता, प्रत्येक अपयशातून काही ना काही शिकून, परीक्षेची तयारी अधिक जोमाने करण्यावर भर दिला. प्रबळ इच्छाशक्ती आणि परिश्रमाचे फळ शेवटी त्यांना चौथ्या प्रयत्नात मिळाले आणि ते IAS अधिकारी बनले. श्रीनाथ यांचा हा प्रेरणादायी प्रवास अनेकांसाठी आदर्श असाच आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.