बिल्डिंग बाहेर रुग्णालयाचा बोर्ड, रुग्णांची ही गर्दी; पण आतील दृश्य पाहून आरोग्य अधिकारी Shocked!
जयपूर : देशातल्या आरोग्य व्यवस्थेवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पूर्वी अनेक जण बोगस डॉक्टरच्या जाळ्यात अडकत होते; पण आता केवळ बोगस डॉक्टरच नव्हेत, तर बोगस रुग्णालयंदेखील सुरू होत आहेत.
या प्रकारामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येत आहे. या प्रकाराला सरकारने वेळीच आळा घालणं गरजेचं आहे. तसंच दोषींवर कठोर कारवाई करणंदेखील आवश्यक आहे.
काही दिवसांपूर्वी अशाच एका रुग्णालयाचा पर्दाफाश राजस्थानमधल्या डुंगरपूर आरोग्य विभागाने केला. एका रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची पाहणी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या.
डुंगरपूर जिल्हा रुग्णालयाजवळच्या एका इमारतीत खासगी रुग्णालय सुरू झालं होतं. श्रीराम चिकित्सालय नावाने सुरू असलेल्या या रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल होते. यात प्रामुख्याने डिलिव्हरीच्या प्रतीक्षेत असलेल्या दोन गर्भवती महिलांचा समावेश होता. जेव्हा पथक रुग्णालयात पोहोचलं आणि तपास सुरू झाला तेव्हा पथकाला अनेक गैरप्रकार झाल्याचं आढळून आलं. रुग्णालयात एकही डॉक्टर नव्हता. संपूर्ण रुग्णालय कर्मचाऱ्यांवर अवलंबून होते. त्यानंतर पथकाने रुग्णालय सील केलं.
एकही डॉक्टर सापडला नाही
एसीएमएचओ डॉ. विपीन मीणा यांनी सांगितलं, की 'आम्हाला अनेकदा या रुग्णालयाबाबत तक्रारी आल्या होत्या. जेव्हा तपास केला तेव्हा या रुग्णालयात गर्भवती महिला डिलिव्हरीसाठी अॅडमिट असल्याचं आढळलं; पण यासाठी रुग्णालयात एकही स्त्रीरोगतज्ज्ञ नव्हता. तसंच अन्य कोणतेही डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे हे रुग्णालय सील करण्यात आलं.'
कर्मचारीवर्ग नव्हता प्रशिक्षित
रुग्णालयाने नेमलेले कर्मचारी रुग्णालयाचं सर्व कामकाज पाहत होते. हे कर्मचारी विनाप्रशिक्षण काम करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं. श्रीराम रुग्णालयाचे रजिस्टर्ड डॉ. जिग्नेश जामोर हे एमबीबीएस असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे त्यांनी रुग्णालयाची नोंदणी केवळ डे केअर अर्थात ओपीडीसाठी केली होती; पण त्यांनी रुग्णालयात प्रसूती विभाग सुरू केला. त्यासाठी रुग्णालयाने स्त्रीरोग-तज्ज्ञांशी कोणताही करार केलेला नव्हता. रुग्णालयात प्रशिक्षण न घेतलेला कर्मचारी वर्ग डिलिव्हरी करत होता. त्यामुळे हे रुग्णालय सील करण्यात आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.