Breaking News ! विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्टीबाबत मोठा निर्णय
राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. तर प्रशासकीय कामांना वेग आला आहे.
निवडणुका जाहीर होताच आता पोलिसांचीही कामे वाढणार आहेत. मुंबईसह राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टीसह रजा बंद केल्या आहेत. पोलिस महासंचालक कार्यालयाने मंगळवारी एक परिपत्रक जारी करत हे आदेश दिले आहेत. रजा बंदीमधून वैद्यकीय रजा आणि अत्यावश्यक कारणांसाठीच्या रजा वगळण्यात आल्या आहेत.
विधानसभा निवडणूक २०२४ चे राज्य पोलिस समन्वय अधिकारी डॉ. छेरिंग दोरजे यांनी संबंधित आदेश जारी केले. अनुचित घटना घडू नये म्हणून सतर्कतेचे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयातून जारी करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिस बंदोबस्त
कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
निवडणूक पार पडेपर्यंत पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक कारणाशिवाय किंवा वैद्यकीय रजा वगळून अन्य कोणत्याही कारणाशिवाय सुट्टी घेता येणार नाही, असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. निवडणुकांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. त्यामुळंच हा निर्णय घेण्यात आल्याचे कळतंय.
मतदार नोंदणीसाठी उरले ३ दिवस
विधानसभेच्या निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांकडे मुंबई उपनगर व मुंबई शहर या दोन्ही जिल्ह्यांसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बुधवारी पालिका मुख्यालयात बैठक घेत मतदानाच्या प्रक्रियेसंदर्भात माहिती दिली. मुंबई शहर व उपनगरात मिळून एक कोटीहून अधिक नोंदणीकृत मतदार आहेत. ज्या नागरिकांची मतदार नोंदणी अद्याप झाली नाही किंवा नोंदणीत दुरुस्ती बाकी आहे, त्यांना १९ ऑक्टोबर मध्यरात्री १२ पर्यंत मुदत असल्याचे त्यांनी सांगितले
राज्यात निवडणुका कधी
महाराष्ट्रात यंदा 288 जागांसाठी निवडणुका होत आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 तारखेला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.