महाराष्ट्रातील 'या' विद्यापीठाला दिलं रतन टाटांचं नाव; शिंदे सरकारने केली घोषणा
विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकींचा धडका सुरुच असून आजही राज्यमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे.
पुढील एक ते दोन दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते अशी शक्यता असल्याने लोकप्रिय निर्णय या बैठकीत घेतले जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या सन्मानार्थ एक मोठा निर्णय घेतला आहे.
काय निर्णय घेण्यात आला?
राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठाला रतन टाटा यांचं नाव देण्यात आलं आहे. या निर्णयाला मंत्रिमंडळाने संमती दर्शवली असून याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती लोढा यांनी दिली.
काय आहे हे विद्यापीठ?
कौशल्य विकास विद्यापीठाची मुंबई आणि पुण्यात स्थापना करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 जुलै 2015 रोजी 'स्किल इंडिया मोहिमे'ची घोषणा केली. त्यांनी या मोहिमेंतर्गत संपूर्ण भारतातील चाळीस कोटी लोकांना कुशल बनविण्याचे वचन दिले आहे. याचाच एक भाग म्हणून कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचा भूमिपूजन समारंभ अलिबागमध्ये 2023 मध्ये पार पडला. या विद्यापीठातर्फे सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाऊड कॉम्पुटिंग, उद्योग 4.0, बांधकाम व्यवस्थापन या विषयांमध्ये एम. टेक. अभ्यासक्रम तसेच बिझनेस ऍनालिसिस या विषयात एम एस्सी. अभ्यासक्रम, एमबीए तसेच विविध आधुनिक विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. https://mssu.ac.in/ या वेबसाईटवर सदर विद्यापीठासंदर्भातील तेथील अभ्यासक्रमांची संपूर्ण माहिती मिळेल.
पुरस्कार आणि भवनालाही रतन टाटांचं नाव
राज्यातील सरकारने यापूर्वीच रतन टाटांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटांना देण्यात आला होता. राज्य शासनाने आता या पुरस्काराचं नाव बदलून रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नरिमन पॉईंट येथे उभारल्या जाणाऱ्या उद्योग भवनालाही त्यांचं नाव दिलं जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. बुधवारी, 9 ऑक्टोबर 2024 रोजी रतन टाटांचं मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये निधन झाल्यानंतर गुरुवारी (10 ऑक्टोबर रोजी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांचं नाव पुरस्काराला देण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी
"तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात तरुणांच्या कौशल्याला वाव आणि रोजगाराची संधी देण्यासाठी त्यांनी इनोव्हेशन सेंटर सुरू केलं. महाराष्ट्र सरकारचा पहिला 'उद्योग रत्न' हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनाचा महाराष्ट्राला सदैव झाला. रतन टाटा यांच्या निधनाने आपला देश आणि महाराष्ट्राचेही कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. टाटा समूहाच्या विशाल परिवाराच्या दुःखात मंत्रिमंडळ सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो, ही प्रार्थना. देशाच्या या महान सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने राज्य मंत्रिमंडळ भावपूर्ण श्रद्धांजली", असं राज्य मंत्रिमंडळाच्या शोकप्रस्तावात म्हटलं. तसेच रतन टाटांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारसही मंत्रिमंडळाने केंद्र सरकारकडे केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.