Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्ह्यात विधानसभेला आता 'आयाराम-गयाराम' पॅटर्न; पाडापाडीमध्ये काही नेत्यांना रस

सांगली जिल्ह्यात विधानसभेला आता 'आयाराम-गयाराम' पॅटर्न; पाडापाडीमध्ये काही नेत्यांना रस
 

सांगली : लोकसभेला सांगली पॅटर्न राज्यात नव्हे, तर देशात चर्चेत आला. आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आयाराम-गयाराम चर्चेत आले आहेत. यंदाच्या विधानसभेला तिकीट मिळविण्यासाठी माजी खासदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हे राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले. भाजपचे मोहन वनखंडे हे काँग्रेसमध्ये गेले. अर्ज भरेपर्यंत आणखी काय बदल पाहायला मिळणार? याची उत्सुकता वाढली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध महायुतीच्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. तसेच सांगली पॅटर्नमुळे चर्चेत आलेल्या सांगली जिल्ह्यातही काही लक्षवेधी लढती पाहायला मिळतील, असे चित्र आहे. जिल्ह्यात निवडून येण्याबरोबर पाडापाडीचे राजकारण केले जाणार, यात कोणतीही शंका नाही. स्वत: निवडून येण्यापेक्षा दुसऱ्याला पाडण्यात काहींना जास्त रस दिसतो, अशी काही मतदारसंघांतील स्थिती आहे. राज्य पातळीवरील कुरघोड्यांचे राजकारण नेतेमंडळींनी जिल्हा पातळीवर आणले आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाआघाडी आणि महायुतीमध्ये जागा कोणाला द्यायच्या, यावरून चर्चा झाली आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात चित्र स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील जागा वाटपाकडे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यात तिकीट मिळविण्यासाठी काहींनी पक्षांतर केले.

माजी खासदार संजय पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत उडी मारली. त्यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पूत्र रोहित पाटील यांच्याविरुद्ध ते शड्डू ठोकतील. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडेही शिवसेनेतून तिकडे त्यांच्या मदतीसाठी गेले. भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरुद्ध शड्डू ठोकण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
आणखी आयारामांची उत्सुकता ..

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळालेले विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात गेले. भाजपचे प्रा. मोहन वनखंडे यांनी पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याविरोधात लढण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणातील आयाराम-गयाराम चर्चेत आले आहेत. या यादीत आणखी कोणाची भर पडणार ते लवकरच दिसून येईल.

उमेदवारीसाठी कायपण?

मिरजेची जागा उद्धवसेनेला मिळू शकते म्हणून यापूर्वीच सिद्धार्थ जाधव यांनी शिवबंधन बांधून घेतले आहे. मिरजेत वंचितची उमेदवारी मिळते म्हणून राष्ट्रवादीचे युवानेते विज्ञान माने तिकडे गेले. तसेच शेवटच्या टप्प्यापर्यंत उमेदवारीसाठी आणखी काय पाहायला मिळणार? याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हाध्यक्ष पक्ष बदलाने कार्यकर्ते संभ्रमात..

मोठ्या राजकीय पक्षात जिल्हाध्यक्ष हे महत्त्वाचे पद असते. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी, तसेच पक्षाचा चेहरा म्हणून या पदाला महत्त्व असते. परंतु रात्रीत जिल्हाध्यक्ष पक्ष बदलत असल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडल्याचे चित्र दिसते. नेत्यांबरोबर काही कार्यकर्त्यांचीही फरफट या निमित्ताने पाहायला मिळत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.