माजी क्रिकेटपटू सलिल अंकोला यांच्या आईचा खून? घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ
पुणे : माजी भारतीय क्रिकेटपटू सलिल अंकोला यांच्या आई डेक्कन परिसरात प्रभात रस्त्यावरील घरात मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या गळ्यावर जखम झाल्याचा व्रण आढळून आला आहे. त्यांचा खून झाला की आत्महत्या ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही.
या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. माला अशोक अंकोला (वय ७७, रा. प्रभात रस्ता, डेक्कन) असे त्यांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, माला अंकोला पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रभात रस्त्यावरील सोसायटीमध्ये त्यांच्या मुलीसमवेत राहत होत्या. त्यांना सिझोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार होता. त्यांच्या गळ्यावर समोरच्या बाजूला जखम आढळून आली आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यानंतर घरातील सदस्य बाहेर गेले होते. त्यानंतर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घरात काम करणारी बाई आली. बेल वाजवूनही दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी मुलीला फोन केला. मुलीने वडिलांना माहिती दिली. त्यांनी दरवाजा उघडला असता माला अंकोला रक्ताच्या थारोळात पडल्या होत्या.
नातेवाइकांनी त्यांना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पूना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. त्यांचा खून झाला की आत्महत्या ही बाब समजू शकली नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.