Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'यांच' ठरेना... 'त्यांचे' जुळेना..!

'यांच' ठरेना... 'त्यांचे' जुळेना..!
 
 
सांगली: पक्षनेते बंडखोरीच्या भीतीने उमेदवारी जाहीर करेनात... पक्षाचे नेतेच बंडखोरीची भाषा उघडपणे करु लागले आहेत... काँग्रेसच्या इच्छुक दोन्ही उमेदवारांकडून पक्षाचा निर्णय जाहीर होण्याआधीच बंडखोरीची भाषा सुरु झाल्याने पक्ष नेते संभ्रमात पडले आहेत. दुसरीकडे भाजपामधील नाराज गट सोशल मीडियावर वेगळ्याच पोष्ट टाकत स्वतंत्र भूमिका घेत असल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. काँग्रेसचे जयश्रीताई पाटील की पृथ्वीराज पाटील असा गोंधळ सुरु आहे, तर दुसरीकडे भाजपा नाराज नेत्यांनाजवळ करायचे नियोजन करताना दिसत आहे. यात मनसे, डावी आघाडी, सांगली आमचीच म्हणणारी उबाठा कुठेच दिसत नाही.

काँग्रेसला पाठींबा द्यायची घाई झालेली असताना काँग्रेसचाच उमेदवार फायनल होईना...

यामुळे सध्या सोशल मीडियावर कार्यकर्ते... स्वतःचीच उमेदवारी जाहीर करुन एकमेकाला ट्रोल करीत आहेत. राजकीय पक्षापेक्षा सोशल मीडियावरील कार्यकर्त्यांनाच राजकीय घाई झाली आहे. यांचा वारसा... त्यांचा संवाद... असा प्रवास सोशल मीडियावर सुरु आहे. भाजपाचे गाडगीळ समर्थकांनी मात्र सोशल मीडियावर आज-गुरुवारी अर्ज दाखलचे निमंत्रण दिले आहे.

 

सांगली विधानसभा मतदारसंघातून भाजपाने सुधीर गाडगीळ यांचे पहिल्या यादीतच नाव जाहीर करुन आघाडी घेतली आहे. काँग्रेसमध्ये अद्याप उमेदवारीवरुन खल सुरु आहे. काल रात्रीपर्यत जयश्रीताई पाटील फायनल अशी चर्चा सुरु झाली, तोपर्यत जयश्रीताई पाटील, पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या समर्थकांच्या बैठका, आणाभाका, शपथा झाल्या. शक्तीप्रदर्शनही झाले. यात या मतदारसंघावर हक्क सांगणारे उबाठा, आंदोलन करणारे मनसे कुठे गायब झाली हे कळेना. कार्यकर्तेही दिसेनात, महायुतीवर आठवले गटाची रिपाई नाराज आहे. आम्हाला कुठे तरी संधी द्या, किमान एखादे महामंडळ तरी द्या अशी अपेक्षा रिपाईची आहे.

सांगली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अद्यापही उमेदवारी जाहीर झालेली नाही. जयश्रीताई पाटील समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे. तोपर्यत पृथ्वीराज पाटील यांनीही बंडखोरीची भाषा केली आहे. आता काँग्रेसचेच आघाडीचे उमेदवार जर सरळ बंडखोरीची भाषा करु लागले तर कार्यकत्यांनी काय करायचे? यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्यातच संभ्रम आहे. कधी पृथ्वीराजबाबा समर्थकांची बैठक होते, तर कधी जयश्रीताई पाटील समर्थकांची बैठक होते. कार्यकर्त्यांनीही थोडा काळ पक्ष बाजूला ठेवून उघडपणे बंडखोरीची भाषा सुरु केली आहे. या दोघांच्या बैठकीत निष्ठा, काम, आंदोलन, पक्ष अशी होत असलेली चर्चा ऐकून पक्ष का वाढला नाही हे समजले. पक्ष, निष्ठा बाजूला ठेऊन आमचे नेते कसे मोठे आहेत, याची माहिती तावातावाने देताना दिसत आहेत. काँग्रेसकडून अद्यापही उमेदवारी जाहीर न केल्याने इच्छुकांचा आजचा गुरुपुष्यामृताचा शंका आहे. मुहूर्त टळणार का? अशी शंका दुसरीकडे भाजपाची उमेदवारी जाहीर झाली आहे. विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ हे यंदा हॅट्ट्रिक करणार का?

याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरु आहे. यावेळी गाडगीळांसह शेखर इनामदार, पृथ्वीराज पवार, नीता केळकर हेही इच्छूक होते. मात्र भाजपाने सुधीर गाडगीळ यांच्यावर विश्वास दाखवत तिसऱ्यांदा संधी दिली. मात्र यावर शेखर इनामदार उघडपणे नाराज झाले. दुसरीकडे पृथ्वीराज पवार, नीता केळकर यांनी गाडगीळ यांच्या प्रचारात सहभागी होऊन पक्षनिष्ठा दाखवून दिली. याघडीपर्यंत इनामदार समर्थक कार्यकर्ते गाडगीळ यांच्या प्रचारापासून दूर आहेत, कदाचित आज-उद्या प्रचारात सहभागी होतील. चंद्रकांतदादा पाटील यांनी इनामदार समर्थकांशी चर्चा केली आहे, इनामदारसाहेब तुम्हीच विधानसभा निवडणूक हातात घ्या असा संवाद सोशल मीडियावर सुरु असला तरी दुरावा दूर होणार का? हा प्रश्न आहे. इनामदार समर्थकांना चंद्रकांतदादांनी कोणता कानमंत्र दिला हे लवकरच समजेल.

एकूणच त्यांचे ठरेना... यांचे जुळेना ...अद्याप उमेदवारी अर्ज दाखल झालेले नसल्याने कार्यकर्ते कार्यकर्ते सोशल मीडियावर गप्पा मारताना दिसत आहेत. बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न नेत्यांकडून सुरु झालेले आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते दोन्हीही इच्छुक उमेदवारांची ताकद आजमावून पहात आहे. पहिल्या टप्प्यात उमेदवारीचा खेळ सुरु आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.