सध्या राजकारणात पैसा, जात, गुन्हेगारीचा प्रभाव शुद्धीकरणासाठी शिवाजी महाराजांच्या विचारांच्या अनुकरणाची गरज ः नितीन गडकरी
सांगली :- आजच्या राजकारणात जात, पैसा आणि गुन्हेगारी हे निकष बनले असल्याचे दिसत आहे. त्याचे शुद्धीकरण करायचे असेल तर महाराजांच्या कर्तृत्वाचे, गुणवत्तेचे त्यांच्या शासन पद्धतीचे, प्रशासकीय कौशल्याचे, अनुकरण राजकारणात असलेल्या लोकांनी जास्त केले पाहिजे, असे मत केंद्रिय भूपृष्ठ व रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगलीत शुक्रवारी केले. छत्रपती शिवाजी महाराज युगप्रवर्तक राजे होते. त्यांचे गुण जर आपण प्रत्येकाने घेतले तर आपला समाज, देश आज आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे जाईल.
येथील मराठा समाज संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह सर्व समाजाच्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झाले. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर, माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम, स्वागताध्यक्ष संजयकाका पाटील उपस्थित होते.
केंद्रिय मंत्री गडकरी म्हणाले, देशाचा इतिहासातील झाले बहु, होतील बहु यासम हा असे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व होते. त्यांचे स्वराज्य हे सर्वधर्म समभाव सांभाळणारे होते. आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श प्रशासक, कर्तव्यनिष्ठ, रयतेबद्दल समर्पित भावनेने काम करणारा त्यागी तपस्वी राजा असे त्यांचे स्मरण करावे लागेल. त्यांनी शत्रूंच्या स्त्रियांचाही सन्मान केला. भूतकाळातल्या इतिहासाचे वर्तमान काळात स्मरण केले तर भविष्यकाळ कसा घडवायचा याची प्रेरणा त्या इतिहासातून मिळते. आजच्या लोकप्रिय राजकारणात जात, पैसा आणि गुन्हेगारी हे निकष बनले आहेत. त्याचे शुद्धीकरण करायचे असेल तर महाराजांच्या कर्तृत्वाचे, गुणवत्तेचे त्यांच्या शासन पद्धतीचे, प्रशासकीय कौशल्याचे अनुकरण करण्याची गरज आहे.राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्यावर संस्कार केले. त्यातूनच त्यांनी सर्व समावेशकता आणि सर्वधर्म समभाव याचे आयुष्यभर पालन केले. त्यामुळे ते आदर्श राजा होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण कुठला गुण घेऊ शकतो आणि स्वतःचा विकास करू शकतो, याचा विचार करण्याची गरज आहे. कुठलाही व्यक्ती जात, पंथ, धर्म, भाषा यांनी मोठा नसतो. तो गुणांनी, कर्तृत्वाने मोठा असतो.
छत्रपती शिवाजी महाराज युगप्रवर्तक राजे होते. त्यांचे गुण जर आपण प्रत्येकाने घेतले तर आपला समाज, देश आज आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे जाईल. आत्मनिर्भर भारत, पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था, विश्वगुरू हे व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला बदलावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचे नेतृत्व हे भविष्यातील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. नवीन किडसमोर शिवाजी महाराज कसे पोहोचतील यासाठी तंत्रज्ञानाचाही उपयोग केला पाहिजे.
मराठा समाज लढवय्या* ः *खासदार शरद पवार
जेष्ठ नेते शरद पवार म्हणाले, मराठा समाज लढवय्या आहे. सर्वांना बरोबर घेवून देशाला पुढे नेण्याचे काम मराठा समाज करतोय. तोच खरा मराठा होय. सांगलीतही मराठा समाज संस्थेने समाजातील अंधश्रध्दा, चुकीच्या श्रध्दा दूर करण्यासाठी कायमच प्रयत्न केला. सर्व धर्म समभावासाठी येथे संस्थेचे मोठे योगदान आहे. देशाच्या प्रगतीत योगदान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे विचार बहुजन समाजाला देण्याचे काम संस्था करते आहे. स्वातंत्र पुर्व काळात देशाच्या कानाकोपर्यात अनेक राजे होऊन गेले. यातील अनेकांना नाव किंवा आडनावाने सत्ता ओळखली गेली.शिवाजी महाराज यांच्या काळातील सत्ता मात्र रयतेचा राजा, हिंदवी स्वराज्य, अशी करुन देण्यात आली. शिवाजी महाराज यांच्यावरील हा विश्वास देशातील नागरिकांचा छाती फुगविणारा आहे. मी संरक्षण मंत्री असताना 20 हजार फुट उंचीवर संरक्षणाची जबाबदारी पेलवणार्या जवानांही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिमान वाटतो. संस्थेकडून स्पर्धा परीक्षांसह अनेक उपक्रम राबविले जातात. हे कौतुकास्पद आहे. आ. विश्वजीत कदम म्हणाले, शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून मराठा समाज जिल्ह्यात कार्यरत आहे. 1972 पासून मराठा समाजाने चांगले काम करीत आहे. मराठा समाजाची व्याप्ती वाढवावी, त्यासाठी काही निर्णय धाडसाने घ्यावेत, अशा सूचनाही केल्या.
या कार्यक्रमास आ. सुधीर गाडगीळ, आ. मानसिंगराव नाईक, आ. सुमनताई पाटील, माजी आ. शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, उल्हास पाटील, सदाशिव पाटील, दिनकर पाटील, नितीन शिंदे, वैभव शिंदे, पृथ्वीराज पाटील, संग्राम देशमुख, पृथ्वीराज पाटील, पद्माराजे पटवर्धन, मराठा समाजचे अध्यक्ष अभिजीत पाटील, विकास मोहिते, ए. डी. पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
पुतळा उद्घाटनाला कुणाचा हात ? डॉ.विश्वजीत कदम
आज योगायोग आहे, सांगलीत आणि कसबा बावडा येथे शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचे अनावरण होत आहे. मात्र पुतळ्याला कुणाचा हात लागतो हे महत्वाचे आहे. पुतळा कुणी केला, त्याचे शिल्पकार कोण, कोणी बसविला, आणि कुणाच्या हस्ते त्याचे पूजन झाले, हे महत्वाचे असल्याचे सांगत आमदार डॉ.विश्वजीत कदम यांनी सिंधुदुर्ग येथील पुतळा आठ महिन्यात पडल्याप्रकरणी महायुती सरकारला टोला लगावला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.