२१ वर्षीय तरुण म्हणाला, 'डाॅक्टर साहेब, मी मुलगी तर नाही ना?'; लिंगाच्या आकारामुळे काहूर
छत्रपती संभाजीनगर : एक २१ वर्षीय तरुण डाॅक्टरांकडे गेला आणि म्हणाला, 'डाॅक्टर साहेब, मी मुलगी तर नाही ना ?' , ' मी मुलगा आहे की मुलगी, हे तपासणी करून सांगा'. डाॅक्टरांनी तरुणाशी संवाद साधला.
समुपदेशन केले. तरुणाच्या मनात हा प्रश्न का आला? तर केवळ लिंगाचा आकार लहान असल्याच्या भावनेतून त्यांच्या मनात या प्रश्नाने काहूर माजविला. तपासणीअंती 'तू मुलगाच' असल्याचा विश्वास डाॅक्टरांनी दिला आणि तरुणाची मानसिक स्थिती पुन्हा सुधारली. परंतु ही स्थिती काही एकाची नाही. यामुळे अनेकजण रुग्णालय गाठत आहेत.
अनेक कारणांमुळे जन्मजात शिशूंमध्ये जननेंद्रीयसंदर्भात आजार उद्भवतात. यात मुलांच्या लिंगासंबंधी अनेक दोष असतात. लहानपणीच या दोषांवर उपचार शक्य आहेत. परंतु अनेक पालक त्याकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम वयात आल्यानंतर मुलांच्या मनावर होतो. त्यातून अनेकजण टोकाचा निर्णय घेत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
किती जणांवर शस्त्रक्रिया?
गेल्या काही दिवसांत ४७ मुलांवर शस्त्रक्रिया करून लिंगाला मूळ आकार देण्यात आला, तर चारशेवर मुलांचे समुपदेशन करण्यात आले.
वेळीच उपचार घेणे महत्त्वपूर्ण
लहान मुलांमध्ये लिंगासंदर्भात काही दोष असेल तर त्याचे निदान वयाच्या १८ महिन्यांपूर्वीच झाले पाहिजे. यासाठी प्रसूतीतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. पालकांनी वेळीच लक्ष दिले पाहिजे. मात्र लाजेमुळे अनेकजण वेळीच लक्ष देत नाहीत. काही प्रश्न निर्माण झाल्यानंतरच उपचारासाठी येतात. परंतु उशिरा आल्यानंतर अनेक अडचणी येतात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये वेळीच उपचार घेणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे.
- डॉ. आर. जे. तोतला, ज्येष्ठ पेडियाट्रिक सर्जन आणि पेडियाट्रिक यूरोलॉजिस्ट
हा आजार नाही, धैर्याने सामोरे जा
हा काही आजार नाही, तर संप्रेरकाची कमतरता, जीन्समध्ये बदल आदींमुळे होते. त्याला धैर्याने सामोरे गेले पाहिजे. पालकांनी वेळीच लक्ष द्यावे. लहानपणीच उपचार करणे सोपे असते. समुपदेशन आणि उपचाराने त्यावर सकारात्मक बदल करता येतो.
- डाॅ. संदीप हंबर्डे, पेडियाट्रिक सर्जन, पेडियाट्रिक यूरोलाॅजिस्ट
वर्तणुकीकडे लक्ष द्यावे
पालकांनी मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष दिले पाहिजे. लिंगासंदर्भात काही दोष असेल तर त्याचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी. लवकर निदान, लवकर उपचार घेणे महत्त्वाचे ठरते.
- डॉ. व्यंकट गिते, मूत्रशल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख, सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल, घाटी
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.