महाविकास आघाडीत मोठी बिघाडी; नाना पटोले असल्यास बैठकीला उपस्थित राहणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच आता महाविकास आघाडीत जागावाटपावरुन खडाजंगी होत असल्याचं स्पष्ट होत आहे. कारण, नाना पटोले यापुढे जागावाटपाच्या बैठकीत असल्यास शिवसेना ठाकरे गटाचे नेते जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, अशी भूमिका शिवसेना ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
महाविकास आघाडीतील जागावाटप हे नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे आडत असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे याबाबत दिल्लीतील काँग्रेसकडे नाना पटोले यांची तक्रारही करण्यात येणार आहे. जागावाटपाची चर्चा ठाकरेंचे नेते हे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी करत आहेत, तिढा असलेल्या जागा लवकरात लवकर सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जावे, अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेची आहे. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेवरुन व सहभागावरुन आता महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याचं स्पष्ट झालंय.
महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील वाढीव जागांसाठी ठाकरे गट आग्रही असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भात जागा न सोडण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये खटके उडाल्याची चर्चा आहे. जागा वाटपाची चर्चा पुढे जात नसल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेविरोधात थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. विदर्भातील काही जागांवर तिढा अद्याप सुटलेला नाही, विदर्भातील तिढा असलेल्या जागांवर नाना पटोले अडून बसल्याची तक्रार ठाकरेंच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
विधानसभा निडणुकांच्या अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना या जागांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा, असा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. मात्र, नाना पटोले यांची भूमिका जागावाटप पूर्ण करत असताना अडचण निर्माण करणारी आहे, असे म्हणत ठाकरेंच्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे हा विषय मांडला असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. तसेच काँग्रेस हाय कमांडने तात्काळ निर्णय घेऊन जागावाटप पूर्ण करावं, अशी ठाकरेंची मागणी आहे. त्यामुळे, आता पुढे काय होईल हे पाहणे महत्वाचे आहे.
शेकापनेही दिली बंडखोरीचा इशारा
महाविकास आघाडीमध्येही जागावाटपावरुन राजकीय खडाजंगी पाहायला मिळत आहे. समाजवादी पक्षाच्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या भूमिकेनंतर आता आणखी एक घटक पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीत सन्मानजनक वागणूक मिळत नसेल तर बाहेर पडण्याची भूमिका जाहीर केली. महाविकास आघाडीत सांगोला विधानसभेची जागा शेकापच्या वाट्याला असताना देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दीपक साळुंखे यांना पक्षात घेतल्याने शेकापची नाराजी आहे. जर महाविकास आघाडीत वेगळा निर्णय घेतला जात असेल तर शेकाप आपला उमेदवार देणार असे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पत्रकाराशी बोलताना स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.