सांगली : उमराणीत तरुणाचा डोक्यात दगड घालून खून
जत :- उमराणी (ता. जत) येथे संदीप गणपती बजंत्री (वय 27) याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. ही घटना शनिवार, दि. 19 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी जत पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
विशाल ऊर्फ विश्वनाथ सिद्राया कैकाडी (बजंत्री) व रवींद्र ऊर्फ कुमार सिद्राय कैकाडी (बजंत्री, दोघे रा. उमराणी) अशी संशयितांची नावे आहेत. समाजातील लोकांच्या बैठकीत देवीच्या मागील शिल्लक वर्गणीचे पैसे परत मागितल्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे; मात्र खुनाच्या कारणाबाबत गावामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्याअनुषंगानेही पोलिस तपास करीत आहेत.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, एका समाजाच्या देवीच्या यात्रेनंतरचा हिशेेब करण्यासाठी समाजातील लोक शनिवारी सायंकाळी एकत्र आले होते. यावेळी सदाशिव मारुती बजंत्री यांनी शिल्लक राहिलेल्या वर्गणीचा जाब विचारला, तसेच ती वर्गणी परत देण्याची मागणी केली. यावरून वाद सुरू झाला. यावेळी विश्वनाथ कैकाडी व कुमार कैकाडी हे सदाशिव यांना शिवीगाळ करू लागले. यावेळी सदाशिव यांचा नातू संदीप याने शिवीगाळ करणार्यांना याबाबत जाब विचारला. यावरून वाद सुरू झाला. यावेळी रागाच्या भरात रवींद्र याने दगड घेऊन संदीपच्या डोक्यात वर्मी घाव घातला. त्याला उपचाराला घेऊन येत असताना अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा वाटेतच मृत्यू झाला. रात्री उशिरा पोलिसांनी दोघा संशयितांवर गुन्हा दाखल केला. जत ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सकाळी उमराणी येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.