Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वयोवृद्ध पेन्शनधारकांसाठी गोड बातमी

वयोवृद्ध पेन्शनधारकांसाठी गोड बातमी
 

सेवानिवृत्त सरकारी कर्मचार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता केंद्र सरकार 80 वर्षे पूर्ण करणार्‍या केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना अतिरिक्त पेन्शन देणार आहे. ही पेन्शन अतिरिक्त अनुकंपा भत्ता म्हणून दिली जाईल.

आयुष्याची महत्त्वाची वर्षे नोकरी करत असताना वेतनाचा आर्थिक आधार असतो; पण साठाव्या वर्षी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर उर्वरित आयुष्य जगताना आर्थिक गरजा भागवण्यासाठीची सुविधा म्हणून कर्मचार्‍यांना पेन्शन दिली जाते. आज महागाईमुळे पेन्शनच्या माध्यमातून मिळणारी रक्कम तुटपुंजी ठरत असली तरीही तो छोट्या स्वरूपातील आर्थिक आधार उतारवयात मोलाचा ठरतो. आज देशात पेन्शनच्या पैशांची साठवणूक करून आपली छोटी-मोठी स्वप्ने पूर्ण करणारेही काही जण आहेत. पेन्शन किती असावी, ती वाढवली पाहिजे याबाबतच्या मागण्या सुरू असताना, नवी पेन्शन योजना आणि जुनी पेन्शन योजना यामधील वादविवाद सुरू असताना एक महत्त्वाची घडामोड घडली आहे.

सरकारी माहितीनुसार पेन्शनधारक ज्या महिन्यात 80 वा वाढदिवस साजरा करतील, त्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अतिरिक्त पेन्शनसाठी पात्र असतील. उदाहरणार्थ, जर एखाद्या पेन्शनधारकाचा जन्म 20 ऑगस्ट 1942 रोजी झाला असेल, तर त्याला ही अतिरिक्त रक्कम 1 ऑगस्ट 2022 पासून मिळणे सुरू होईल. त्याचप्रमाणे, जर त्याचा जन्म 1 ऑगस्ट 1942 रोजी झाला असेल, तर अतिरिक्त पेन्शनदेखील 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होईल.

एकदा पेन्शनधारक 80 वर्षांचा झाला की, त्याला त्याच्या मूळ पेन्शन किंवा अनुकंपा भत्त्यापेक्षा 20 टक्के जास्त पेन्शन मिळेल. वय वाढत असताना ही वाढ चालू राहील. 85 ते 90 वयोगटातील जास्तीचे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत वाढते, तर 90 ते 95 दरम्यान अतिरिक्त पेन्शन 40 टक्क्यांपर्यंत जाते आणि त्याचप्रमाणे 100 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना त्यांच्या मूळ पेन्शनच्या पूर्ण 100 टक्के रक्कम मिळेल. अतिरिक्त पेन्शन सुरू करण्याबाबत असणारा संभ्रम दूर करण्यासाठी सरकारने ही माहिती दिली आहे. सर्व संबंधित विभाग आणि बँकांना ही माहिती जास्तीत जास्त सामायिक करण्यास सांगितले आहे. जेणेकरून त्याची अंमलबजावणी अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.