कोल्हापूर :- दारू पिण्यासाठी पाण्याची बाटली मागितल्याने हद्दपार गुंडाकडून डोक्यात दगड घालून एकाचा खून
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आहे. निवडणूक शांततेत व्हावी, म्हणून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर ठेवली जात आहे.
कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी
जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या गुंडाने आज निवडणूक आचारसंहिता सुरू असतानाच
डोक्यात दगड घालून एकाचा खून केला. सतीश महादेव पाटील (वय ४८, रेल्वेस्थानक
परिसर, कोरगांवकर कंपाऊंडशेजारी, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. खून
केल्याप्रकरणी हद्दपार गुंड सौरभ दीपक जाधव (वय २२, रा. कनाननगर) आणि रोहन
ऊर्फ चिक्या विजय गायकवाड (वय २४, रा. एपी स्कूल कंपाऊंड, कनानननगर) या
रेकॉर्डवरील दोघांना पोलिसांनी अटक केली.
यापैकी सौरभला करवीर प्रांताधिकारी
यांनी हद्दपार केले आहे. त्यांच्यासोबत एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी
ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पाण्याची बाटली मागितल्याच्या कारणावरून
रेल्वेस्थानक परिसरातील कोरगांवकर कंपाऊड येथे काल रात्री झालेल्या भांडणात
हा खून झाला. आज पहाटे ही घटना उघडकीस आली. सतीश पाटील यांचे शवविच्छेदन
आज सकाळी सीपीआरमध्ये झाले. दुपारनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. सतीश
पाटील यांचे भाऊ सागर महादेव पाटील यांनी याबाबतची फिर्याद दिली असल्याचे
शाहूपुरी पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.
पोलिसांकडून
आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सतीश पाटील यांना दोन मुले
आहेत. ते विक्रमनगरात राहतात. पाटील हे भाऊ सागर यांच्याकडे कोरगांवकर
कंपाऊंड परिसरात राहत होते. शक्यतो ते घराबाहेरच असायचे. नेहमीप्रमाणे काल
रात्री ते कोरगांवकर कंपाऊंड येथील रद्दी खरेदी-विक्री गोदामाच्या शेजारी
एका दुकानाच्या दारात झोपले होते. त्याच ठिकाणी रात्री आलेले सौरभ आणि रोहन
यांनी त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पाणी मागितले. यातून त्यांच्यात
किरकोळ वाद झाला होता. यातून जाधवने त्यांच्या डोक्यात दगड घालून सतीश
यांचा खून केला. तेथून त्यांनी पळ काढला.
दरम्यान, आज पहाटे नागरिकांना सतीश पाटील झोपलेल्या ठिकाणी रक्त असल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती सतीश यांचे भाऊ सागर यांना दिली. त्यानंतर सागर यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर खून झाल्याचा संशय व्यक्त करून शाहूपुरी पोलिसांना याची माहिती दिली. शाहूपुरी पोलिसांनी घटनस्थळावरील पंचनामा करून मृतदेह सीपीआरमध्ये हलविला. त्यानंतर खून झाल्याची माहिती सर्वत्र पसरली.पोलिसांनी घटनास्थळी संशयितांचा शोध घेत असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. घटनास्थळाच्यासमोरच मिळालेल्या सीसीटीव्हीमधून संशयितांची ओळख स्पष्ट झाली. यामध्ये जाधवला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी, तर उर्वरित दोघांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यांच्याकडे अधिक तपास करून त्यांना रात्री अटक केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेच निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.
तीन महिन्यांपूर्वीच जिल्ह्यातून हद्दपार
करवीर प्रांताधिकारी हरिष धार्मिक यांनी गुंड सौरभ दीपक जाधवला तीन महिन्यांपूर्वीच जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. त्यामुळेच त्याला हद्दपार केल्याचे प्रशासनातून सांगण्यात आले. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आहे. निवडणूक शांततेत व्हावी, म्हणून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर ठेवली जात आहे. हत्यारे प्रशासन ताब्यात घेत आहे. अशी स्थिती असतानाही हद्दपार गुंडाने चक्क शहरात येऊन खून केल्याची घटना काल घडली आहे.
सीसीटीव्ही फुटेजची मदत
घटनास्थळी सतीश यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोक्यात दगड घातल्याची माहिती पुढे प्रथमदर्शनी पुढे आली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही पाहिले. ज्या दुकानाच्या दारात सतीश झोपले होते, त्याच परिसरातील दुकानासमोरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी संशयितांना अटक केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.