राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. एकीकडे उमेदवारांच्या प्रचाराचा धुराळा सुरु असताना दुसरीकडे मात्र नाराज उमेदवारांच्या संख्येत वाढ होत आहे.
पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकीट कापण्यात आले आहे. महायुतीकडून पालघर विधानसभेतून शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे श्रीनिवास वनगा हे नाराज झाले आहेत. काल रात्रीपासून श्रीनिवास वनगा हे गायब झाले आहेत. गेल्या १२ तासांपासून ते नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे आता सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
शिंदे गटाकडून काल विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी शिंदे गटाकडून माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे श्रीनिवास वनगा हे नाराज झाले होते. राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनगा यांच्याशी चर्चा केली. पण उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या संयमाचा बांध फुटला. त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर रडत आपली फसवणूक झाल्याचे म्हटले. ‘उद्धव ठाकरे हे देवमाणूस होते. मी घातकी माणसासोबत गेलो आणि माझा घात झाला’, असे श्रीनिवास वनगा म्हणाले होते.
यानंतर गेल्या १४ तासांपासून श्रीनिवास वनगा यांचा फोन नॉट रिचेबल आहे. श्रीनिवास वनगा यांची पत्नी सुमन वनगा यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास वनगा हे काल संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घराबाहेर पडले. ते आपले दोन्हीही मोबाईल बंद करुन घरातून निघून गेले. घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी एका पिशवीत काही कपडे भरले होते. ती पिशवी घेऊन श्रीनिवास वनगा हे घराबाहेर पडले.त्यांनी घरातून बाहेर पडताना आपण कुठे जातोय हे कोणालाही सांगितलं नाही. तसेच त्यांचा फोनही बंद आहेत. आम्ही त्यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी काहीही संपर्क झालेला नाही. मी त्यांच्या मित्रांनाही फोन केला. त्यांच्याकडे विचारपूस केली. मी त्यांच्या ड्रायव्हर, बॉडीगार्डलाही विचारलं. रात्री अंधार होता, त्या अंधारात ते घराबाहेर पडले आणि पटापट चालत गेले, असे सुमन वनगा यांनी म्हटले.
पोलिसांकडून शोध सुरु
श्रीनिवास वनगा हे घराबाहेर पडून आता बरेच तास उलटले आहेत. त्यांनी कोणाशीही संपर्क साधलेला नाही. यामुळे श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे. सध्या श्रीनिवास वनगा यांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अनेक कार्यकर्तेही त्यांच्या घराबाहेर जमले आहेत. मात्र अद्याप श्रीनिवास वनगा यांनी कोणाशीही संपर्क केलेला नाही. त्यामुळे ते नेमके कुठे गेलेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.