कडेगाव : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सोमवारी भब्य दुचाकी रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेली प्रचंड गर्दी आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या लोकप्रियतेची साक्ष देत होती.
येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला. त्यांच्यासमवेत खासदार विशाल पाटील, मातोश्री विजयमाला कदम, स्वप्नाली विश्वजित कदम, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, मध्य प्रदेशचे माजी आमदार कुणाल चौधरी, 'एनएसयुआय'चे अध्यक्ष अमीर शेख, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, डॉ. जितेश कदम, दिग्विजय कदम, हर्षवर्धन कदम आदी उपस्थित होते.
चिंचणी (ता. कडेगाव) येथील शिवस्मारक व डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरातील डॉ. पतंगराव कदम यांच्या 'लोकतीर्थ' स्मारकाचे दर्शन घेऊन रॅलीची सुरुवात झाली. पुढे जीपमधून आमदार डॉ. कदम मतदारांना अभिवादन करीत होते. त्यामागे हजारो दुचाकींची रॅली होती. चिंचणी, सोनहिरा कारखाना, तडसरमार्गे रॅली कडेगाव येथे प्रांताधिकारी कार्यालयात आली. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला, तेथून रॅली मोहरम चौकात आली. यावेळी मोहरम चौकात विराट जाहीर सभा झाली. या सभेलाही प्रचंड गर्दी जमली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.