कोल्हापूर :- हृदयद्रावक! दिवाळीसाठी केलेल्या किल्ल्यावर लाईटिंग माळा जोडताना विजेच्या धक्क्याने मुलाचा दुर्दैवी मृत्यू
कोल्हापूर : घरासमोर दिवाळीसाठी केलेल्या किल्ल्यात विजेच्या (लाईटिंग) माळा जोडताना विजेचा धक्का लागून वेदांत सुधीर झेंडे (वय १२, रा.कणेरकरनगर) याचा मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळी घडली. त्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर झेंडे कुटुंबावर आघात केला.
रात्री उशिरा मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. झेंडे कुटुंब मूळचे शिवाजी पेठेतील संध्यामठ गल्लीतील आहे. वेदांतचे वडील बंगळूरमध्ये एका खासगी कंपनीत व्यवस्थापक आहेत. त्यांची पत्नी साक्षी, मुलगा वेदांत, लहान मुलगा वीरेंद्र हे आईसोबत राहतात. आई, आजीला मानसिक धक्का वेदांतवर उपचार सुरू असल्याची समजूत नातेवाईक घालत होते; परंतु वेदांतची आई व आजीची त्याला पाहण्यासाठी धडपड सुरू होती.
अखेर त्याच्या मृत्यूची माहिती समजताच दोघींना मानसिक धक्का बसला. नातेवाईक, शेजाऱ्यांनी दोघींना सावरत वाहनातून घरी नेले. त्याचे वडील बंगळूरवरून कोल्हापूरकडे येण्यास निघाले आहेत. वेदांतचा मृतदेह शवविच्छेदनानंतर शीतगृहात ठेवण्यात आला असून, वडील शुक्रवारी पोहोचल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला.
इलेक्ट्रिक वस्तूंची आवड....
वेदांतला इलेक्ट्रिक वस्तूंची आवड होती. तो घरातही नेहमी इलेक्ट्रिक वस्तू, खेळण्यातील इलेक्ट्रॉनिक्स वाहने हाताळायचा. तसेच लॅपटॉपवर गेम खेळायचा, असे नातेवाईक सांगत होते. किल्ला बनविल्यानंतर लाईटिंग माळा लावणे, आकाश कंदील लावण्यासाठी त्याचा पुढाकार असायचा. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अर्धा तास वेदांत निपचित....
वेदांत कळंब्याजवळील इंग्लिश मीडियम शाळेत इयत्ता सहावीत शिकत होता. शाळेतून सायंकाळी घरी आल्यानंतर तो दिवाळीसाठी दारात बनवलेल्या किल्ल्याजवळ विजेच्या माळा जोडत होता. याचवेळी त्याला विजेचा धक्का बसला. बराचवेळ वेदांतचा आवाज न आल्याने आई साक्षी बाहेर आल्या. यावेळी वेदांत किल्ल्याजवळ निपचित पडला होता. त्याला स्पर्श करताच विजेचा धक्का लागल्याने साक्षी ओरडल्या. शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत लाईटिंगची माळ बाजूला करत वेदांतला तातडीने रुग्णालयात आणले. बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये आणलेल्या वेदांतचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.