संजीव खन्ना बनले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश; केंद्र सरकारनं केलं शिक्कामोर्तब
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची भारताचे नवे सरन्यायाधिश म्हणून आज नियुक्ती झाली. राष्ट्रपतींच्या सल्ल्यानं केंद्र सरकारनं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असून नियुक्तीचं नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे.
मावळते सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी न्या. खन्ना यांच्या नावाची शिफारस सरकारकडं केली होती. येत्या 10 नोव्हेंबर 2024 रोजी चंद्रचूड हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी न्या. खन्ना सरन्यायाधिशपदाची शपथ घेतील.
यासंदर्भात केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ट्विट करत न्या. खन्ना यांची नियुक्ती करण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, "भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या अधिकाराचा वापर करून, राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर न्या. खन्ना यांची नियुक्ती केल्याबद्दल आनंद होत आहे. भारताच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश संजीव खन्ना हे 11 नोव्हेंबर 2024 पासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील"न्या.संजीव खन्ना हे सध्या सुप्रीम कोर्टातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत, ते देशाचे ५१ वे सरन्यायाधीश असतील. खन्ना यांचा सरन्यायाधीश म्हणून कार्यकाळ सहा महिन्यांचा असणार आहे. 13 मे 2025 रोजी ते सेवानिवृत्त होतील, सध्या ते 64 वर्षांचे आहेत. आत्तापर्यंत सुमारे 275 खंडपीठांमध्ये संयुक्तरित्या त्यांनी निकाल दिले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.