Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रेमो डिसोजा, पोलीस कर्मचार्‍यासह ७ आरोपी; डान्स ग्रुपच्या तरुणांची १२ कोटींची फसवणूक

रेमो डिसोजा, पोलीस कर्मचार्‍यासह ७ आरोपी; डान्स ग्रुपच्या तरुणांची १२ कोटींची फसवणूक

वसई : भाईदर मधील प्रसिध्द 'वी अनबिटेबल' या डान्स ग्रुपच्या तरुणांची १२ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ग्रुपच्या व्यवस्थापकासह ७ जणांवर मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मध्ये बॉलिवूडचा प्रसिध्द नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोजा तसेच पोलीस आयुक्तालयातील एका पोलिसाचाही समावेश आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास आता आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा-२ कडे वर्ग करण्यात आला आहे.


भाईंदर मधील तरुणांनी एकत्र येऊन 'वी अनबिटेबल' हा डान्स ग्रुप तयार केला होता. ओमप्रकाश चौहान या ग्रुपचा व्यवस्थापक होता. त्याने ग्रुपचे खाते, सोशल मिडिया अकाऊंट तयार केले होते. प्रसिध्द चॅनेलवर या ग्रुपने स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर अमेरिकेतील 'अमेरिका गॉट टॅलेंट' या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला होता. प्रसिध्द डान्स दिग्दर्शक रेमो डिसोजा याने या तरुणांच्या आयुष्यावर सिनेमा देखील बनविण्याची घोषणा केली होती. मात्र आमची फसवणूक केल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांमधून मिळणारे मानधन, बक्षिसांची रक्कम, सिनेमासाठी मिळालेले पैसे आदींचा अपहार करण्यात आल्याचा मुलांचा आरोप आहे. याप्रकरणी नवघर पोलीस, मिरा रोड पोलीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. परंतु गुन्हा दाखल न झाल्याने या मुलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये रेमो डिसोजा एण्टरटेनमेंट कंपनीचे संचालक आणि बॉलीवूड मधील प्रसिध्द नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोजा, त्यांची पत्नी लिझेल डिसोजा, व्यवस्थापक ओमप्रकाश चौहान, आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी विनोद राऊत, रमेश गुप्ता, रोहीत जाधव आणि फेम प्रॉडक्शन कंपनी अशा ७ जणांचा सहभाग आहे. आरोपींनी एकूण ११ कोटी ९६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
तपास गुन्हे शाखा-२ कडे वर्ग

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा २ च्या पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. आम्ही याप्रकरणी चौकशी करून तपास करत आहोत. मागील ६ वर्षात हा सर्व प्रकार घडला आहे. त्यामुळे आरोपींची नेमकी भूमिका काय आणि कशी फसवणूक झाली त्याचा तपास करत आहोत, अशी माहिती गुन्हे शाखा-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे यांनी दिली. पोलीस कर्मचारी विनोद राऊत हे नवघर पोलीस ठाण्यात असताना ते वाद सोडविण्यासाठी गेले होते. त्यामुळे तक्रारीत त्यांचे नाव असल्याने त्यांना देखील आरोपी करण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.