'जब मिल बैठे अजितदादा और वो तीन यार.'
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पराभवासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच कंबर कसली आहे. अजितदादांनी जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनाच आपल्याकडे खेचले आहे. त्यांना राष्ट्रवादीत घेत इस्लामपूर मतदारसंघातून तिकीटही जाहीर केले आहे.
केवळ तिकीट जाहीर करुन अजितदादांनी निशिकांत पाटील यांना वाऱ्यावर सोडलेले नाही. त्यांच्या जोडीला जयंत पाटील यांचे दुसरे स्थानिक विरोधक, आमदार सदाभाऊ खोत आणि कधी जयंत पाटील यांना साथ देणारे, कधी विरोध करणारे माजी खासदार संजय पाटील या तिघांची अजितदादांनी मोटही बांधून दिली आहे. यातून आता जयंत पाटील यांच्याविरोधात चेहरा निशिकांत पाटील यांचा, प्रचार सभांमध्ये बोलण्याची जबाबदारी सदाभाऊंकडे आणि मतांचा मोठा गठ्ठा मिळवून देण्याची जबाबदारी संजयकाकांकडे असणार आहे. आपल्या देवगिरी बंगल्यावरुन हे गणित सेट करुनच अजितदादांनी इंदापूरला प्रस्थान केले.
शरद पवार यांच्या पक्षाच्या विजयासाठी महाराष्ट्रभर फिरणाऱ्या जयंत पाटील यांनाही अडचणीत आणण्यासाठी अजितदादांनी डाव टाकला आहे. दोन पाटील आणि सदाभाऊ खोत यांची मोट बांधून देत भाजपचे सांगलीतील सगळे केडर जयंत पाटील यांच्याविरोधात उभे केले आहे. त्यामुळे जयंत पाटील इस्लामपूरमध्येच अडकून राहतील, ते फार काळ राज्यभर फिरणार नाहीत, याची दक्षता अजितदादांनी घेतली आहे.
निशिकांत पाटील हे मागील काही वर्षांपासून जयंत पाटील यांचे परंपरागत विरोधक म्हणून उभे राहिले आहेत. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी इस्लामपूर मतदारसंघ भाजपसाठी सुटणार अन् निशिकांत पाटील उभे राहणार अशी चर्चा होती. जयंत पाटील यांच्याविरोधात वातावरण निर्मितीही झाली होती. या वातावरण निर्मितीला इस्लामपूर पालिकेतील सत्तांतरणाची किनारही होती. पण ऐनवेळी जागा शिवसेनेला सुटली अन् गौरव नायकवडी यांना उमेदवारी मिळाली. त्यावेळी निशिकांत पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. यावेळी जयंत पाटील यांचेमताधिक्य कमी करण्यात यश आले होते. याच बैठकीत अजितदादांनी तासगाव-कवठे महांकाळचीही फिल्डिंग लावून दिली. संजयकाका पाटील हे दिवंगत आर. आर. पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. आबा जिवंत असेपर्यंत या दोघांचे एक दिवसही सख्य जमले नाही. अगदी तासगावमधील एखाद्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून नगरपालिका, पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकीमध्ये दोघांचे वेगळे तंबू असायचे. एक काळ तर असा होता की संजयकाका पाटील आणि आर. आर. पाटील हे दोघेही राष्ट्रवादीचेच आमदार होते. पण खुद्द शरद पवार यांनाही या दोघांचे समेट घडवून आणता आला नाही. आता याच संजयकाका पाटील यांना अजितदादांनी आर. आर. पाटील यांचे चिरंजीव आणि शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्याविरोधात उभे केले आहे. त्यामुळे तासगाव-कवठेमहांकाळची लढतही संपूर्ण राज्यभर गाजणार हे निश्चित आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.