सांगली :- माझ्यापेक्षा मोबाईल महत्त्वाचा काय, म्हणत पत्नीस चाकूने भोसकले; पतीस अटक
गली : माझ्यापेक्षा तुला मोबाइल महत्त्वाचा आहे काय?, तू घरी नांदायला का येत नाहीस?, असे म्हणून पत्नी शांती ऊर्फ कोमल सुशांत तूपसौंदर्य (वय २४) हिला चाकूने भोसकल्याचा प्रकार घडला.
याप्रकरणी पती सुशांत शहाजी तूपसौंदर्य (वय २८, रा. म्हाडा कॉलनी, संजयनगर) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजयनगर पोलिस ठाण्याजवळील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या सुशांत आणि शांती यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. दोघेही म्हाडा कॉलनीत राहायला होते. सुशांत हा शांतीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. शांती ही सतत मोबाइल बघत असल्यामुळे वाद होत होता. पतीबरोबरच्या भांडणामुळे शांती ही सांगलीत माहेरी राहायला आली होती.
शनिवारी दुपारी एकच्या सुमारास सुशांत हा शांतीकडे आला. त्याने तिला शिवीगाळ करत 'तुला माझ्यापेक्षा मोबाइल महत्त्वाचा आहे काय?, तू घरात नांदायला का येत नाहीस?, तुला मस्ती आली आहे, तुला आता जिवंत सोडत नाही', असे म्हणत चाकूने पोटात भोसकले. तसेच, तिच्या खांद्यावर, पाठीवर, गुडघ्यावर वार केले. हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तेव्हा, सुशांत तेथून निघून गेला. जखमी शांती हिला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.