चोरीच्या गोवंशाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक छोटा हत्तीसह ४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त, इस्लामपूर पोलिसांची कारवाई
सांगली :- वाळवा तालुक्यातील पेठ, ऐतवडे खुर्द येथील गोवंशाची चोरी करून विक्रीसाठी त्याची वाहतूक करताना दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या ५ गायी, एक छोटा हत्ती टेम्पो असा ४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती इस्लामपूरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली.
अमर आत्माराम बिरम्हने (वय २५, रा. मोहरी, ता. भोर), रविंद्र ठकसेन रायते (वय ३०, रा. गुणवरे, ता. फलटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी कारवायांवर नजर ठेवण्याच्या सूचना निरीक्षक हारूगडे यांनी सहकाऱ्यांना दिल्या आहेत. निरीक्षक हारूगडे भवानीनगर परिसरात गस्त घालत असताना एका छोट्या टेम्पोमधून (एमएच १२ यूएम ३०५१) गोवंशाची विक्रीसाठी वाहतूक होत असल्याची माहिती त्यांना खबऱ्याद्वारे मिळाली.
निरीक्षक हारूगडे यांनी पथकासह पुणे-बंगळुरू रस्त्यावर सापळा रचला. हायवेवरून माहिती मिळालेला टेम्पो दिसल्यानंतर तो थांबवण्यात आला. त्याची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये ५ गायी आढळून आल्या. टेम्पोतील बिरम्हने, रायते यांच्याकडे त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पेठ आणि ऐतवडे खुर्द येथून गोवंशाची चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याची विक्री करण्यासाठी जात असल्याचीही कबुली दिली. त्यानंतर गोवंशासह टेम्पो जप्त करून दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून इस्लामपूर आणि कुरळप पोलिस ठाण्याकडील दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.इस्लामपूरचे पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, वरीष्ठ निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाने सजनराव पाटील, सतीश खोत, अमोल सावंत, शशिकांत शिंदे, विशाल पांगे, दीपक घस्ते आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.