सांगली : महाविकास आघाडीत मिरज मतदारसंघावरून वाद पेटला आहे. हा मतदारसंघ आपल्याच वाट्याला येणार, असे गृहीत धरून तयारी केलेल्या काँग्रेसची शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने कोंडी केली आहे. 'मिरज आम्हालाच हवे,' अशी दोन्ही पक्षांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांना दिल्लीपर्यंत धडक द्यावी लागली आहे.
दरम्यान, सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी कोणाला द्यायची, हा वाददेखील आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. विश्वजित, विशाल दिल्लीत पोहोचले आहेत. ते पक्षाच्या वरिष्ठांसमोर सांगलीतील परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करतील. त्यानंतर 'प्रदेश'चे नेते आणि राष्ट्रीय समिती त्यावर निर्णय घेईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील यांच्या समर्थकांचे दिल्लीकडे डोळे लागले आहेत.
जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सहा जागांचा प्रश्न सुटला आहे. खानापूर, मिरज मतदारसंघाचा निर्णय अद्याप बाकी आहे. खानापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने लढावे, यावर एकमत झाल्याचे समजते. मात्र, जोवर मिरज मतदारसंघाचा तिढा सुटत नाही, तोवर त्याची घोषणा होणार नाही, असे सांगण्यात आले. मिरजेत काँग्रेसने भाजप नेते मोहन वनखंडे यांना प्रवेश दिला आहे. तेथून ॲड. सी. आर. सांगलीकर हेही इच्छुक आहेत. मात्र, शिवसेना मिरजवर हक्क सांगत आहे. याच मिरज शहरातून उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती.आता पुन्हा त्याच मिरजेचा वाद पेटला आहे. त्यावर आज दिल्लीतील बैठकीत चर्चा झाली. महाविकास आघाडीचा ९०-९०-९०चा फॉर्म्युला तयार करण्यात आला असून त्या जागा वाटपात मिरजेचा तिढा सुटेल, असे सांगण्यात आले. राष्ट्रवादीकडे सध्या जिल्ह्यातील तीन जागा, काँग्रेसकडे तीन जागा, तर दोन जागांचा वाद आहे. मिरज काँग्रेसकडे, खानापूर राष्ट्रवादीकडे गेल्यास समसमान जागा होतील. मात्र, शिवसेना जिल्ह्यातून हद्दपार होईल. त्यामुळे खानापूर सोडावी लागल्यास मिरज हवी, अशी शिवसेनेची भूमिका आहे. काँग्रेसला 'खानापूर'मध्ये रस नाही. असा विचित्र तिढा निर्माण झाला आहे. त्याचा निर्णय रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत अपेक्षित आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.