Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले

माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
 

पंजाब पोलिसांनी एका महिला माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना सापळा रचून पकडले आहे. फिरोजपूरच्या माजी आमदार सत्कार कौर गेहरी आणि त्यांचा भाचा जसकीरत सिंग या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे.

यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनुसार या दोघांना खरडच्या सनी एन्क्लेव्हजवळ ताब्यात घेण्यात आले. हे दोघे तिथे हेरॉईन विकण्याचा प्रयत्न करत होते. माजी आमदार सत्कार या ड्रग डील करत असल्याची ठोस माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांना सापळा रचला होता. दोन पोलिसांनाच गिऱ्हाईक बनवून तिच्याशी संपर्क साधण्यात आला होता. या दोघांनी या पोलिसांना ड्रग देताच त्यांना सापळा रचलेल्या पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला. हे पाहून या दोघांनी कारमध्ये बसून पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी जसकीरतने एका पोलिसाला कारने उडविले. यात या पोलिसाला दुखापत झाली आहे. पाठलाग करून या दोघांना पोलिसांनी पकडले आहे. 

पुढील तपासात माजी आमदाराच्या घरातून २८ ग्रॅम हेरॉईन मिळाले आहे. यामुळे त्यांच्याकडून एकूण १२८ ग्रॅम हेऱॉईन जप्त करण्यात आले आहे. तसेच घरातून दीड लाख रुपये रोख व हरियाणा, दिल्लीच्या अनेक कारच्या नंबर प्लेटही मिळाल्या आहेत. याचबरोबर पोलिसांनी फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यू, ह्युंदाई व्हर्ना व शेवरोलेची कार अशा चार कार जप्त केल्या आहेत. 

सत्कार कौर या २०१७-२२ या काळात काँग्रेसच्या आमदार होत्या. विधानसभा निवडणुकीत सत्कार यांची प्रतिमा लोकांत चांगली नसल्याचा रिपोर्ट हायकमांडकडे आल्याने त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. ड्रग तस्करीबरोबरच सत्कार कौर व त्यांचे पती जसमेल सिंग यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सरकारवेळी जसमेल सिंग हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.