बारामतीतून अजित पवारच लढवणार निवडणूक !
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार हेच उमेदवार असतील. हे आज स्पष्ट झाले. बारामती शहरात अजित पवार यांच्या प्रचार यंत्रणेकडून त्यांच्या नावाच्या प्रचाराच्या गाड्या तयार करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.
या प्रचार रथावर विधानसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख असून निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समोरील घड्याळाचे बटन दाबून अजित पवार यांना विजयी करा असा उल्लेख या वर करण्यात आला आहे.त्यामुळे आता बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व मित्र पक्षप्रणित महायुतीचे उमेदवार म्हणून अजित पवार हेच उमेदवार असतील, हे आता स्पष्ट झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 29 ऑक्टोबर रोजी अजित पवार बारामतीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
लोकसभा निवडणूकीनंतर मध्यंतरीच्या काळात अजित पवार यांनी बारामतीतून निवडणूक न लढविण्याचे अनेकदा संकेत दिले होते, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता होती. बारामतीतच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा ताफा अडवून तुम्हीच आम्हाला उमेदवार हवे आहात, अशा घोषणा दिल्यानंतर, तुमच्या मनात जे आहे तेच घडेल, असे अजित पवार यांनी जाहीर केले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.